मुंबई
avengers doomsday मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. जगभरात प्रचंड लोकप्रिय असलेल्या मार्व्हल स्टुडिओजने बहुप्रतीक्षित ‘अॅव्हेंजर्स : डूम्सडे’ या चित्रपटाची पाच नवीन पोस्टर्स प्रदर्शित केली आहेत. या पोस्टर्समधून मार्व्हल विश्वातील सर्वात शक्तिशाली आणि भयंकर खलनायकांपैकी एक असलेल्या डॉक्टर डूमची दमदार झलक पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असताना या नव्या पोस्टर्समुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
अॅक्शन, थरार आणि भव्य दृश्यांची मेजवानी असलेला ‘अॅव्हेंजर्स : डूम्सडे’ हा चित्रपट १७ डिसेंबर २०२६ रोजी भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू या चार भाषांमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. प्रेक्षकांना चित्रपटाचा भव्य अनुभव घेता यावा, यासाठी 4DX, RealD 3D, ScreenX, Dolby आणि Marvel Studios Presented Infinity Vision अशा प्रीमियम फॉरमॅट्समध्येही तो प्रदर्शित केला जाणार आहे.
वर्षातील सर्वाधिक प्रतीक्षित सिनेमॅटिक अनुभवांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उलटगणती सुरू झाली आहे. प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी चाहत्यांमधील उत्सुकताही वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मार्व्हल स्टुडिओजने एकाच वेळी पाच नवीन पोस्टर्स सादर करून चित्रपटाच्या प्रमोशनला वेग दिला आहे. या पोस्टर्समध्ये डॉक्टर डूमच्या व्यक्तिरेखेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, आगामी संघर्षाची तीव्रता अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
‘अॅव्हेंजर्स : डूम्सडे’मध्ये तगडी कलाकारांची फळी, थरारक अॅक्शन आणि उत्कंठावर्धक कथानक पाहायला मिळणार असल्याचे संकेत आतापर्यंतच्या प्रमोशनल साहित्यातून मिळत आहेत. मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सची ओळख असलेली भव्यता, नेत्रदीपक दृश्ये आणि प्रभावी कथाकथन यांचा अनुभव या चित्रपटातून प्रेक्षकांना घेता येणार आहे. विशेषतः डॉक्टर डूमसारख्या बलाढ्य खलनायकाचा प्रवेश या कथानकाला कोणते वळण देणार, याबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
नव्या पाच पोस्टर्समुळे चित्रपटातील संघर्षाची व्याप्ती आणि त्यामागील थरार याविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. त्यामुळे १७ डिसेंबरला प्रदर्शित होणारा ‘अॅव्हेंजर्स : डूम्सडे’ हा चित्रपट मार्व्हल चाहत्यांसाठी वर्षातील सर्वात मोठ्या सिनेमॅटिक सोहळ्यांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे.