मुंबई
central railway update रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूरदरम्यान धावणाऱ्या कोयना एक्सप्रेससह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते होसपेटदरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही मार्गांवरील गाड्यांना आता पारंपरिक आयसीएफ डब्यांऐवजी आधुनिक एलएचबी डबे जोडण्यात येणार आहेत. जानेवारी २०२७ पासून हा बदल टप्प्याटप्प्याने लागू होणार असून, त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होण्यास मदत होणार आहे.
कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणाऱ्या कोयना एक्सप्रेसच्या पारंपरिक रेकचे एलएचबी रेकमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या गाडीच्या डब्यांची रचनाही कायमस्वरूपी सुधारित करण्यात आली आहे. नव्या रचनेनुसार कोयना एक्सप्रेसमध्ये एक वातानुकूलित द्वितीय श्रेणीचा डबा, तीन वातानुकूलित तृतीय श्रेणीचे डबे, सहा शयनयान डबे आणि सहा सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. याशिवाय एक जनरेटर कार आणि द्वितीय आसन व्यवस्था, सामान तसेच गार्डसाठी ब्रेक व्हॅन असलेला एक डबा जोडण्यात येणार आहे. अशा प्रकारे या गाडीला एकूण १८ एलएचबी डबे असतील.
मध्य रेल्वेने या बदलांच्या अंमलबजावणीसाठी तारखाही जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, गाडी क्रमांक ११०२९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस १२ जानेवारी २०२७ पासून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून एलएचबी डब्यांसह सुधारित रचनेत धावणार आहे. तर गाडी क्रमांक ११०३० कोल्हापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोयना एक्सप्रेस १० जानेवारी २०२७ पासून कोल्हापूर येथून नव्या एलएचबी रेकसह रवाना होईल.
दुसरीकडे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि होसपेटदरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसच्या डब्यांमध्येही बदल करण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक १११३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-होसपेट एक्सप्रेस १० जानेवारी २०२७ पासून मुंबईहून एलएचबी डब्यांसह सुधारित रचनेत धावेल. तर गाडी क्रमांक १११४० होसपेट-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस ११ जानेवारी २०२७ पासून होसपेट येथून आधुनिक एलएचबी रेकसह चालवण्यात येणार आहे.
पारंपरिक आयसीएफ डब्यांच्या तुलनेत आधुनिक एलएचबी डब्यांमुळे रेल्वे प्रवासातील सुरक्षितता आणि आरामात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या गाड्यांमधून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नव्या डब्यांचा लाभ मिळणार आहे. विशेषतः मुंबई-कोल्हापूर आणि मुंबई-होसपेट मार्गावरील प्रवाशांसाठी हा बदल महत्त्वाचा ठरणार आहे.
या गाड्यांचे सुधारित वेळापत्रक, प्रवासाचे तपशील आणि थांब्यांची माहिती जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या [www.enquiry.indianrail.gov.in](http://www.enquiry.indianrail.gov.in) या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा एनटीईएस (NTES) ॲपचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांनी जानेवारी २०२७ पासून लागू होणाऱ्या या बदलांची नोंद घेऊन त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.