Deepo festival starts tomorrow वर्षभर ज्या सणाची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आतुरतेने वाट पाहतात, त्या दिवाळीच्या उत्सवाला ५ नोव्हेंबर २०२६ पासून सुरुवात होत आहे. दिव्यांची रोषणाई, घरासमोरील सुंदर रांगोळ्या, फराळाचा दरवळ आणि लक्ष्मीपूजनाचा धार्मिक सोहळा यामुळे संपूर्ण वातावरण उत्साहाने भरून जाणार आहे. यंदा ५ नोव्हेंबरला वसुबारसने दीपोत्सवाचा प्रारंभ होईल, तर ११ नोव्हेंबरला भाऊबीजेने या उत्सवाची सांगता होणार आहे. विशेष म्हणजे, यंदा ८ नोव्हेंबरला नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असल्याने दिवाळीच्या मुख्य उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवार, ५ नोव्हेंबरला वसुबारस साजरी केली जाणार आहे. या दिवशी सायंकाळी ५ वाजून ३६ मिनिटे ते रात्री ८ वाजून ११ मिनिटांपर्यंत पूजेचा मुहूर्त आहे. गाय आणि वासराची पूजा करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा या दिवशी पाळली जाते. त्यानंतर शुक्रवार, ६ नोव्हेंबरला धनत्रयोदशी साजरी होईल. सायंकाळी ६ वाजून ३२ मिनिटे ते रात्री ८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत लक्ष्मी-कुबेर पूजनाचा मुहूर्त आहे. भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि कुबेराची पूजा करण्याबरोबरच सोने, चांदी आणि नवीन वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे.
खरेदीसाठी सकाळी ८ ते ११ या वेळेत लाभ-अमृत योग, दुपारी १२.३० ते २ या वेळेत शुभ योग आणि रात्री ९.३० ते ११ या वेळेत लाभ योग आहे. यमदीपदानासाठी सायंकाळी ५.४५ ते रात्री ७.२० ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. रविवार, ८ नोव्हेंबरला नरक चतुर्दशी साजरी होणार असून पहाटे ५.३४ ते ६.३३ या वेळेत अभ्यंगस्नानाचा मुहूर्त आहे. भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून जनतेला त्याच्या अत्याचारातून मुक्त केले, अशी धार्मिक मान्यता आहे. याच दिवशी सायंकाळी ६.२६ ते रात्री ८.२६ या वेळेत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असून माता लक्ष्मी, भगवान गणेश आणि देवी सरस्वतीची पूजा केली जाईल. तसेच सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या काळात शुभ-अमृत योग आहे.
यानंतर मंगळवार, १० नोव्हेंबरला दिवाळी पाडवा अर्थात बलिप्रतिपदा साजरी केली जाणार आहे. सकाळी ९.२५ ते दुपारी १.३२ हा पूजेसाठी शुभ काळ आहे. या दिवशी राजा बळी आणि भगवान विष्णूच्या वामन अवताराचे स्मरण केले जाते. महाराष्ट्रात पाडव्याला पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि विश्वास व्यक्त करण्याची परंपरा आहे. पत्नी पतीला औक्षण करते, तर पती भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त करतो. याशिवाय सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत लाभ-अमृत योग आणि दुपारी ३.३० ते सायंकाळी ५ या वेळेत शुभ योग आहे. बुधवारी, ११ नोव्हेंबरला भाऊबीजेने दिवाळी उत्सवाची सांगता होईल. दुपारी १.३० ते ३.४५ हा ओवाळणीचा मुहूर्त आहे. या दिवशी बहीण भावाला औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुखी जीवनाची प्रार्थना करते. भाऊही बहिणीला भेटवस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करतो. अशा प्रकारे वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या सणांच्या माध्यमातून ५ ते ११ नोव्हेंबरदरम्यान दिवाळीचा आनंदोत्सव साजरा होणार आहे.