वॉशिंग्टन,
Democratic candidate wins in Michigan अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार अब्दुल अल-सैयद यांनी मिशिगनमधील सिनेटच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते माइक रोजर्स यांचा पराभव केल्याची माहिती समोर आली आहे. या विजयामुळे अल-सैयद अमेरिकेच्या सिनेटवर निवडून जाणारे पहिले मुस्लिम खासदार ठरल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यांच्या विजयाची चर्चा केवळ अमेरिकेतच नव्हे, तर भारतातही होत आहे. कारण अल-सैयद यांचे कुटुंबीय नाते भारताशी जोडलेले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अल-सैयद यांना विरोध केला होता. त्यांना 'जिहादी' असे संबोधल्याचाही उल्लेख वृत्तात करण्यात आला आहे.
अल-सैयद यांनी प्रचारात सर्वांसाठी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे आणि सरकारी यंत्रणेला उत्तरदायी बनवणे या मुद्द्यांवर भर दिला होता. अमेरिकेतील महत्त्वाच्या राजकीय रणांगणांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मिशिगनमध्ये त्यांची माइक रोजर्स यांच्याशी अटीतटीची लढत झाली. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. सिनेटमधील सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्ष प्रयत्नशील असताना अल-सैयद यांचा विजय पक्षासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांच्या विजयामुळे अमेरिकेच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अब्दुल अल-सैयद यांचे भारताशी असलेले नाते त्यांच्या पत्नी डॉ. सारा जुकाकू यांच्यामुळे जोडले गेले आहे. सारा या मानसोपचारतज्ज्ञ असून त्यांचे कुटुंब कर्नाटकातील भटकळ येथील आहे. मंगलुरूपासून सुमारे १४० किलोमीटर अंतरावर भटकळ हे ठिकाण आहे. सारा या शमसुद्दीन जुकाकू यांच्या नात आहेत. शमसुद्दीन यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बी. डी. जत्ती यांच्या नेतृत्वाखालील म्हैसूर संस्थानच्या सरकारमध्ये वित्त उपमंत्री म्हणून काम पाहिले होते. रोड्स स्कॉलर असलेल्या अल-सैयद यांची साराशी ओळख मिशिगन विद्यापीठात शिक्षण घेत असताना झाली. दक्षिण भारतातील आपल्या पत्नीच्या कुटुंबाशी आणि तेथील संस्कृतीशी असलेल्या जवळिकीबद्दलही त्यांनी यापूर्वी भाष्य केले आहे.