पुणे,
gokul-milk-union-electionकोल्हापूर जिल्ह्यातील साडे पाच लाख शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ' दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून राजकीय वातावरण तापले आहे. काठावरचं बहुमत असलेल्या सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीचे शशिकांत चुयेकर यांची निवड लांबणीवर पडली आहे. तर, दुसरीकडे राज्य सरकारकडून गोकुळवर शासन नियुक्त ४ सदस्यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. या सदस्यांना मतांचाही अधिकार असू शकतो. असे झाल्यास महायुतीचं पॅनेल गोकुळमध्ये सत्तेवर येऊ शकतो. तर, दुसरीकडे या गदारोळात आता शिवसेना शिंदे गटाची एन्ट्री झाली असून, पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी ट्विटरवर पोस्ट करत एक मोठा दावा केला आहे.
राज्य सरकारकडून गोकुळवर ४ नवीन शासननियुक्त संचालक नियुक्त केले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हा निर्णय झाल्यास विरोधक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतेज पाटील यांना मोठा धक्का बसू शकतो. या स्वीकृत संचालकांमुळे गोकुळमधील सत्तेचे गणित बदलून महायुतीकडे स्पष्ट बहुमत येण्याची आणि सत्ता स्थापन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घडामोडींवर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उच्च न्यायालयाच्या एका जुन्या निर्णयाचा संदर्भ देत महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये असताना अशाच प्रकारच्या स्वीकृत सदस्यांच्या मतदानाच्या अधिकाराविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निकाल देताना उच्च न्यायालयाने, "अशा प्रकारच्या स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार देता येणार नाही," असे स्पष्ट आदेश दिले होते.