मुल्ला,
gondia-police-diwali-tribal-aidगडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवरी तालुक्यातील पिपरखारी परिसरात गोंदिया जिल्हा पोलिस दलाने सामाजिक बांधिलकी जपत दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले. दादालोरा पोलिस खिडकी योजनेंतर्गत गोंदिया जिल्हा पोलिस दल व माऊली सेवा संघ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पिपरखारी येथे १ नोव्हेंबर रोजी हा उपक्रम उत्साहात पार पडला.
जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे व अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या संकल्पनेतून तसेच देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेश तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत पिपरखारी, गौरीटोला, महाजनटोला व पुरामटोला येथील गरीब आदिवासी कुटुंबांतील एकूण १४५ महिला व गरजू नागरिकांना साड्या, ब्लँकेट, मिठाई, चिवडा तसेच इतर जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. दिवाळीच्या सणानिमित्त पोलिसांकडून मिळालेल्या या मदतीमुळे आदिवासी बांधवांच्या चेहर्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील नागरिकांशी पोलिसांचे नाते अधिक दृढ व्हावे, आदिवासी समाजातील नागरिकांमध्ये विश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि पोलिस दलाची सकारात्मक प्रतिमा जनमानसात रुजावी, या उद्देशाने अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाला माऊली सेवा संघ, नागपूरचे सुहास खरे व त्यांची संपूर्ण टीम, चिचगड पोलिस ठाण्याचे ठाणेदार जनार्दन हेगडकर, एओपी पिपरखारीचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक नेताम, वैद्यकीय अधिकारी डॉ. जाटवे, पोलिस अधिकारी व अंमलदार तसेच परिसरातील गावकरी, महिला व आदिवासी बांधव उपस्थित होते.