बंगळुरू,
hockey-player-somaiya भारतीय हॉकीसाठी अभिमानास्पद ठरलेल्या ऐतिहासिक सुवर्णपदकावरच चोरांनी हात साफ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू एम. एम. सोमैया यांच्या बंगळुरू येथील घरात चोरी झाली असून, चोरांनी १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले सुवर्णपदक लंपास केले आहे. याशिवाय त्यांच्या कारकिर्दीतील अन्य महत्त्वाची पदके आणि मौल्यवान वस्तूही चोरीला गेल्या आहेत.
बंगळुरूतील इंदिरानगर परिसरातील न्यू थिप्पसंद्र येथे ही घटना घडली. सोमैया हे २५ ते २८ ऑक्टोबरदरम्यान आपल्या कुटुंबासह मूळ गावी कोडगू येथे गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि मौल्यवान वस्तूंसह अनेक वर्षांच्या क्रीडा कारकिर्दीच्या आठवणी असलेली पदकेही चोरून नेली.
सोमैया २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर २८ ऑक्टोबरला सकाळी ७.१५ वाजता ते घरी परतले. यावेळी घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या चोरीमध्ये १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकासोबतच १९८२ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदकही चोरीला गेले आहे. तसेच १९८६ च्या सेऊल आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक आणि ॲमस्टरडॅम येथे झालेल्या १९८२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील कांस्यपदकाचाही चोरलेल्या वस्तूंमध्ये समावेश आहे.
एम. एम. सोमैया यांनी आपल्या कारकिर्दीत तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून, भारतीय संघाचे नेतृत्वही केले आहे. त्यामुळे चोरीला गेलेली पदके ही केवळ मौल्यवान वस्तू नसून भारतीय हॉकीच्या इतिहासाचा महत्त्वाचा ठेवा मानली जात आहेत.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासोबतच चोरीला गेलेली ऐतिहासिक पदके पुन्हा मिळवण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे क्रीडा क्षेत्रात आणि परिसरात खळबळ उडाली आहे.