कारंजा लाड,
incident-on-the-samruddhi-expressway नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर गस्तीवर असलेल्या पोलिस व्हॅनला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने तीन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची घटना मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. चॅनेल क्रमांक १६२ जवळ घडलेल्या या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, जगदीश घरडे (वय ४८), अलिम शेख (वय २९) आणि तोहीम शेख (वय २७) हे एमएच १२ झेड.सी ५३४६ क्रमांकाच्या पोलीस वाहनाने समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरमध्ये गस्त घालत होते. दरम्यान, चॅनेल क्रमांक १६२ येथे पोलिस व्हॅन यू-टर्न घेत असताना एका अज्ञात वाहनाने पोलिस व्हॅनला धडक दिली. धडक दिल्यानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून न थांबता निघून गेला. त्यानंतर मागून येणार्या दुसर्या वाहनानेही पोलिस व्हॅनला धडक दिल्याने हा अपघात घडला. या दुहेरी धडकेत व्हॅनमधील तिन्ही पोलीस कर्मचारी जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील १०८ रुग्णवाहिका सेवेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आयसी-०८ येथील १०८ रुग्णवाहिकेचे पायलट रवी (सोनू) शिंदे आणि डॉ. गणेश यांनी घटनास्थळी पोहोचून जखमी पोलिसांना तातडीने प्राथमिक वैद्यकीय उपचार दिले.
त्यानंतर पुढील उपचारासाठी तिन्ही जखमींना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. समृद्धी महामार्गावर सातत्याने होणारे अपघात आणि धडक देऊन घटनास्थळावरून पसार होणार्या वाहनचालकांच्या घटनांमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचार्यांनाच अशा अपघाताचा सामना करावा लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.