मानोरा,
indefinite-hunger-strike मौजा हट्टी, गट ग्रामपंचायत वापटा येथील रोजगार सेवक यांनी रोजगार हमीच्या कामात केलेला भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतरही त्याचे विरुद्ध फौजदारी स्वरूपाची कार्यवाही आणि सदर रोजगार सेवक पदावरून निष्कासित करावे, या मागणीसाठी समस्त गावकरी मंडळी हट्टी यांच्या वतीने पंचायत समिती, मानोरा येथे ४ नोव्हेंबर २०२६ पासून आमरण उपोषणाला ग्रामस्थानी प्रारंभ केला आहे.
गावकर्यांच्या म्हणण्यानुसार, मनरेगा कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे. गोर गरीब ग्रामस्थांची आर्थिक पिळवणूक झाली असून, योजनामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. ग्रामपंचायतकडून भ्रष्टाचारास खतपाणी घातले जात असल्याचा आरोपही गावकर्यांनी केला आहे. गोर गरीब ग्रामस्थांची आर्थिक पिळवणूक थांबवा, योजनामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा ग्रामपंचायतकडून भ्रष्टाचारास मिळणारे खतपाणी बंद करा, दोषी रोजगार सेवकावर तात्काळ फौजदारी कार्यवाही करून पदावरून निष्कासित करा अशा घोषणा देत गावकर्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.
या प्रकरणात प्रशासनाने अद्याप ठोस कारवाई केलेली नसल्याने गावकर्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. जोपर्यंत दोषीवर तात्काळ कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा समस्त गावकरी मंडळी हट्टी यांनी घेतला आहे. उपोषण आंदोलनाला प्रमोद चव्हाण, श्रीकृष्ण राठोड यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. आता प्रशासन या आमरण उपोषणाची दखल घेऊन चौकशी करून दोषींवर कारवाई करते का, याकडे संपूर्ण हट्टी व परिसराचे लक्ष लागले आहे.