भारतासह चार देशांना इराणची सवलत; व्यापारी जहाजांचा मार्ग मोकळा

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Iran grants concession to India जागतिक व्यापार आणि सागरी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत इराणने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या सागरी मार्गावर लागू असलेल्या वाहतूक निर्बंधांतून भारतासह चार देशांच्या व्यापारी जहाजांना सूट देण्यात आली आहे. भारत, चीन, इराक आणि कतार या देशांच्या जहाजांना आता या मार्गावरून प्रवास करण्यासाठी निर्बंधांचा सामना करावा लागणार नाही. इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण समितीचे उपाध्यक्ष अमीर हयात-मोगद्दम यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे संबंधित देशांच्या व्यापारी जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून वाहतूक करणे अधिक सुलभ होणार आहे.
 
 

ch768879
 
इराणी स्टुडंट्स न्यूज एजन्सीला (आयएसएनए) दिलेल्या मुलाखतीत अमीर हयात-मोगद्दम यांनी या सवलतीबाबत स्पष्टीकरण दिले. भारत, चीन, इराक आणि कतारच्या व्यापारी जहाजांना सध्या या सागरी मार्गावरील वाहतूक निर्बंधांतून सूट देण्यात आली असून, त्यांची जहाजे सहजपणे मार्गक्रमण करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या देशांच्या जहाजांच्या वाहतुकीला अमेरिकेकडूनही अडथळा आणला जात नसल्याचा दावा त्यांनी केला. इराणने घेतलेल्या या निर्णयामागे राजनैतिक संबंध आणि आर्थिक हितसंबंध महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
भारताला देण्यात आलेल्या सवलतीचा उद्देश देशासाठी आवश्यक असलेल्या औषधांची आयात सुलभ करणे हा असल्याचे हयात-मोगद्दम यांनी सांगितले. तर चीनच्या जहाजांना दिलेल्या विशेष सवलतीमागे बीजिंगचे राजकीय समर्थन मिळवण्याचा हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या वाहतुकीबाबत इराणने घेतलेला हा निर्णय केवळ आर्थिक नसून आंतरराष्ट्रीय राजनैतिक संबंधांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात आहे.