मुंबई
kanika kapoor ‘बेबी डॉल’ आणि ‘चिट्टियां कलाइयां’ यांसारख्या लोकप्रिय गाण्यांमुळे प्रसिद्धी मिळवलेली बॉलिवूडची पार्श्वगायिका कनिका कपूर हिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कनिकाने उद्योगपती गौतम हाथीरमानी यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. २०२२ मध्ये लंडनमध्ये दोघांनी विवाह केला होता. मात्र, चार वर्षांच्या संसारानंतर त्यांनी आपापले मार्ग वेगळे करण्याचे ठरवले आहे. वयाच्या ४८व्या वर्षी कनिकाने सोशल मीडियावर पोस्ट करत या निर्णयाची माहिती दिली. तसेच, या कठीण काळात आपल्या खासगी आयुष्याचा आदर करण्याचे आवाहनही तिने चाहत्यांना केले आहे.

विशेष म्हणजे, विभक्त होण्याची घोषणा करण्यापूर्वी कनिकाने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावरून लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ हटवले होते. त्यानंतर तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत चर्चांना सुरुवात झाली होती. अखेर तिने स्वतः याबाबत स्पष्टीकरण दिले. आपल्या अधिकृत निवेदनात कनिकाने म्हटले आहे की, बराच विचार केल्यानंतर तिने आणि तिच्या पतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. एकत्र घालवलेल्या काळाबद्दल ती कृतज्ञ असून गौतम यांच्या पुढील आयुष्यासाठी तिने शुभेच्छा दिल्या आहेत. दोघेही आता आयुष्यात पुढे जात असल्याने त्यांच्या खासगी आयुष्याचा आणि निर्णयाचा आदर करावा, अशी विनंतीही तिने केली आहे.
दरम्यान, एका वृत्तसंस्थेशी बोलताना कनिकाने या विभक्त होण्यामागे तिसरी व्यक्ती असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. आपल्या आयुष्यात दुसरे कोणी आलेले नाही आणि गौतम यांच्या आयुष्यातही अन्य कोणी असल्याची आपल्याला माहिती नाही, असे तिने स्पष्ट केले. तसेच, हा आपला दुसरा घटस्फोट असल्याने या परिस्थितीमुळे दुःख आणि निराशा झाल्याची भावनाही तिने व्यक्त केली. गौतम कामानिमित्त नायजेरियातील लागोस येथे वास्तव्यास असतात. मात्र, कनिकाला लागोसला जायचे नसल्यामुळे त्यांचा संसार मोडल्याचा दावा चुकीचा असल्याचेही तिने स्पष्ट केले.
सध्या कनिका मुंबईत असून तीन प्रकल्पांवर काम करत आहे. तिच्यावर तीन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी असल्याचेही तिने सांगितले. गौतम यांच्यासोबत भविष्यातील संबंध चांगले आणि सौहार्दपूर्ण राहावेत, अशी आपली इच्छा असल्याचे कनिकाने नमूद केले. आपण वाद घालणारी व्यक्ती नसून गौतम यांचीही अशीच भूमिका असेल, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली. विभक्त होण्याचा निर्णय घेतला असला, तरी परस्परांमधील संबंध कटू होऊ नयेत, यावर तिचा भर असल्याचे या वक्तव्यावरून दिसून येते.
कनिका कपूर आणि गौतम हाथीरमानी यांची ओळख अनेक वर्षांपूर्वी झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री होती. कालांतराने या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. २० मे २०२२ रोजी लंडनमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये खासगी समारंभात दोघे विवाहबंधनात अडकले होते. या सोहळ्याला दोन्ही कुटुंबांतील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
गौतम यांच्याशी विवाह करण्यापूर्वी कनिकाचे लग्न लंडनमध्ये वास्तव्यास असलेले जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर जसप्रीत सिंह चंडोक यांच्याशी झाले होते. मात्र, २०१२ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. या पहिल्या विवाहातून कनिकाला आयना, समारा आणि युवराज अशी तीन मुले आहेत. पहिल्या विवाहानंतर तिने एकल माता म्हणून मुलांचा सांभाळ केला. मूळची लखनऊची असलेली कनिका आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी भारतात येत असते.
दरम्यान, गायिका म्हणून कनिकाने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. २०१२ मध्ये डॉ. झ्यूस यांच्यासोबत केलेल्या ‘जुगनी जी’ या गाण्यामुळे तिला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेबी डॉल’ या गाण्याने तिला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. या गाण्यानंतर तिच्या कारकिर्दीला मोठी झेप मिळाली. ‘चिट्टियां कलाइयां’, ‘टुकुर टुकुर’, ‘गेंदा फूल’ आणि ‘ऊ बोलेगा या ऊ ऊ बोलेगा’ यांसारखी तिची गाणीही लोकप्रिय ठरली आहेत.
व्यावसायिक आयुष्यात यशाची नवी शिखरे गाठणाऱ्या कनिकाच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र पुन्हा एकदा मोठे वळण आले आहे. दुसऱ्या विवाहातूनही विभक्त होण्याचा निर्णय घ्यावा लागल्याने तिने दुःख व्यक्त केले आहे. मात्र, मुलांचे संगोपन, संगीत क्षेत्रातील काम आणि गौतम यांच्यासोबत भविष्यात सौहार्दपूर्ण संबंध राखण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचे तिच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.