कमळाशिवाय लक्ष्मीपूजन अपूर्ण? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |
Lakshmi Puja is incomplete without a lotus दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. संपूर्ण देशभरात उत्साहाने साजरा होणारा हा प्रकाशाचा आणि सुख-समृद्धीचा सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो. यंदा ८ नोव्हेंबर २०२६, रविवार रोजी दिवाळी साजरी केली जाणार असल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे. या दिवशी सायंकाळी लक्ष्मी-गणेश पूजन करण्याची धार्मिक परंपरा आहे. लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीला विविध फुले अर्पण केली जातात. मात्र, कमळाचे फूल महालक्ष्मीला विशेष प्रिय असल्याची धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे पूजेच्या वेळी कमळ अर्पण केल्यास देवीची कृपा कायम राहते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
 
 
 
Lakshmi Puja
 
हिंदू पौराणिक मान्यतेनुसार, देवी लक्ष्मीचा अवतार कमळाच्या फुलातून झाला असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे लक्ष्मीपूजनात देवीला 'अष्टकमल' अर्थात आठ कमळाची फुले अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे. देवी लक्ष्मीला 'कमला' आणि 'कमलासना' या नावांनीही ओळखले जाते. कमळावर विराजमान असलेली देवी, असा या नावांचा अर्थ आहे. चिखलात उमलूनही कमळ आपले सौंदर्य आणि स्वच्छता टिकवून ठेवते. त्याचप्रमाणे माणसानेही सभोवतालच्या नकारात्मक परिस्थितीत स्वतःमधील चांगुलपणा जपावा, असा संदेश या फुलातून मिळतो. श्रीमद्भगवद्गीतेतील श्लोकातही कमळाच्या पानाचे उदाहरण देत कर्म करताना आसक्तीपासून दूर राहण्याचा विचार मांडण्यात आला आहे. जो व्यक्ती फळाची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य पार पाडतो, तो पाण्यात असूनही न भिजणाऱ्या कमळाच्या पानाप्रमाणे पापांपासून अलिप्त राहतो, असा या श्लोकाचा भावार्थ आहे.
 
 
दिवाळीच्या लक्ष्मीपूजनात देवीला कमळ अर्पण करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असल्याचे धार्मिक मान्यतेत सांगितले जाते. पूजेसाठी ताजी, स्वच्छ आणि पूर्णपणे उमललेली कमळाची फुले निवडावीत. ती हाताळताना काळजी घ्यावी आणि भक्तिभावाने देवीच्या चरणी अर्पण करावीत. त्याचबरोबर सुकलेली, तुटलेली किंवा कीड लागलेली कमळाची फुले पूजेत वापरू नयेत. फुले तोडताना निष्काळजीपणा टाळून पवित्रता आणि स्वच्छतेची काळजी घ्यावी. श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेल्या पूजेला विशेष महत्त्व असल्याचे धार्मिक परंपरेत मानले जाते.