मानोरा,
kondoli-gram-panchayat मौजे कोंडोली येथील १८७ गरीब, वंचित आणि गरजू कुटुंबाची अधिकृत घरकुल यादी ग्रामपंचायत स्तरावर जाणीवपूर्वक रखडवून ठेवल्याचा आरोप करत, समस्त घरकुल लाभार्थी कुटुंबांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती मानोरा यांच्याकडे सामूहिक अर्जाद्वारे न्यायाची मागणी केली आहे.
पंचायत समिती मानोरा येथे सादर करण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, कोंडोली गावातील एकूण १८७ घरकुल लाभार्थ्यांची अंतिम यादी आणि ठराव स्थानिक ग्रापं प्रशासनाकडे वारंवार तोंडी व लेखी मागणी करूनही गेल्या अडीच महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यानंतरही लाभार्थ्यांची ही अंतिम यादी आणि आवश्यक तो प्रशासकीय ठराव मानोरा पंचायत समिती कार्यालयाकडे सादर करण्यात आलेला नाही. स्थानिक पातळीवर केवळ ’आज पाठवतो, उद्या पाठवतो’ अशी टोलवाटोलवीची उत्तरे देऊन गोरगरीब लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घरापासून वंचित ठेवले जात आहे. घरकुल हा आमच्या हक्काच्या निवार्याचा अत्यंत संवेदनशील बाब असून, स्थानिक दिरंगाईमुळे लाभ मिळण्यास प्रचंड विलंब होत आहे. त्यामुळे आमचे घरकुल सुरक्षित राहून आम्हाला न्याय मिळावा, हीच आमची मुख्य मागणी असल्याचे लाभार्थ्यांनी म्हटले आहे.
कोंडोली ग्रामपंचायतीकडून ही रखडलेली १८७ लाभार्थ्यांची घरकुल यादी आणि ठराव आपल्या स्तरावरून तात्काळ अधिकृत आदेश काढून मागवून घ्यावा.या प्रकरणाची सखोल चौकशी करून लाभार्थ्यांचे अडकलेले घरकुल तात्काळ मंजूर करण्याची पुढील प्रक्रिया सुरू करावी.सदर अर्जाची दखल घेऊन प्रशासनाने पुढील ७ दिवसांच्या आत योग्य ती कायदेशीर कारवाई न केल्यास, गावातील सर्व १८७ वंचित लाभार्थी कुटुंबांसह लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन व उपोषणास बसण्यास बाध्य होतील, याची कृपया नोंद घ्यावी, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर सतीश बंडूजी मोरे, बेबी धनंजग भवाळ, श्रावण महादेव सिंगोड, प्रकाश आनंदा भवाळ, प्रियंका गोपाल भवाळ, राधेश्याम शालीक सिंगोड, ज्ञानेश्वर भगवान हुबे, सोमेश हरी इंगळे, मीरा अमोल शेकोले, विकल सखाराम लोहटे यांच्यासह समस्त १८७ घरकुल लाभार्थी कुटुंब, मौजे कोंडोली यांच्या स्वाक्षर्या आहेत. सोबत १८७ लाभार्थ्यांची मूळ घरकुल यादी (प्रत) देखील जोडण्यात आली आहे.