मुंबई,
maharashtra-rapido-ola-uber-driver-checkरॅपिडो, ओला, उबर यांसारख्या ॲपआधारित प्रवासी वाहतूक सेवांच्या चालकांविरोधात विविध प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित चालकांची काटेकोर तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मोटार परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.
मुंबईतील माहिम परिसरात रॅपिडो बाइक टॅक्सी चालविणाऱ्या एका व्यक्तीविरोधात दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. संबंधित व्यक्तीच्या सोशल मीडिया खात्यांवरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचा आरोप असून, या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. मात्र, प्राथमिक तपासात संबंधित व्यक्तीचे पाकिस्तानमधील व्यक्ती किंवा संघटनेशी थेट संबंध असल्याचा पुरावा आढळला नसल्याचे वृत्त आहे.
या घटनेच्या अनुषंगाने ॲपआधारित वाहतूक सेवांमध्ये कार्यरत असलेल्या चालकांची पडताळणी, त्यांच्या कागदपत्रांची वैधता आणि प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक नियमांचे पालन याबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे मंत्री सरनाईक यांनी अधोरेखित केले. केवळ एखादी घटना घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी अशा प्रकारच्या वाहतूक सेवांवर नियमित देखरेख ठेवून त्यांना राज्य परिवहन प्राधिकरणाच्या कक्षेत आणण्यासाठी कायद्यात सुधारणा करावी. तसेच संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.