दिवाळीत पावसाची एक्झिट पण गारवा वाढणार!

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |

मुंबई,
maharashtra-weather-forecastनोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील हवामानात बदल होताना दिसत आहेत. बंगालच्या उपसागरातील मुरासू चक्रीवादळामुळे काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, आता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने 4 नोव्हेंबरसाठी जारी केलेल्या जिल्हानिहाय हवामान अंदाजानुसार, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसासह मेघगर्जनेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही.
 
environment
 
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये 4 नोव्हेंबर रोजी हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांना पावसापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या पावसासह मेघगर्जनेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत 4 नोव्हेंबर रोजी पावसाची शक्यता नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातही हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर तापमानातही चढ उतार बघायला मिळत आहे. रात्रीच्या वेळी वातावरणात गारवा जाणवण्याची शक्यता आहे.
 
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पुणे घाटमाथा परिसरात प्रामुख्याने कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत मेगगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे.
 
विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये कुठलीही पावसाची शक्यता नाही. त्यामुळे कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आहे. या विभागात देखील तापमानात चढ उतार होवून रात्रीच्या वेळी वातावरणात गारवा जाणवू शकतो. हवामानातील बदल लक्षात घेता शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांची काढणी करून ती सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. काढणी केलेल्या शेतमालावर पावसाचा परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू असताना शेतात काम करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.