कसोटी क्रमवारीत स्टार्कचा पुन्हा डंका!

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
mitchell-starc ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने आयसीसीच्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवले आहे. ४ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत स्टार्कने दक्षिण आफ्रिकेच्या मार्को जॅनसेनला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. विशेष म्हणजे, अवघ्या एका आठवड्यात स्टार्कने दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाला मागे टाकले आहे.
 
mitchell-starc
 
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अंतिम सामना केपटाऊनमधील न्यूलँड्स मैदानावर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी स्टार्कने आपल्या गोलंदाजीने छाप पाडली. त्याने दोन्ही डावांत मिळून नऊ फलंदाजांना बाद केले. याच कामगिरीचा फायदा त्याला आयसीसी क्रमवारीत झाला असून, त्याने पुन्हा अव्वल स्थान गाठले आहे.
 
यापूर्वी मालिकेतील दुसऱ्या कसोटीत स्टार्कला केवळ तीन विकेट मिळाल्या होत्या. त्याउलट मार्को जॅनसेनने सहा बळी घेत प्रभावी कामगिरी केली होती. त्यामुळे जॅनसेनने क्रमवारीत स्टार्कला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले होते. मात्र, अंतिम कसोटीत स्टार्कने नऊ विकेट घेत पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले. ताज्या क्रमवारीत त्याच्या खात्यात ८८१ रेटिंग गुण आहेत, तर जॅनसेन ८७५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.
 
भारतीय गोलंदाजांचा विचार करता, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा कसोटी गोलंदाजांच्या पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून काही काळ दूर असूनही बुमराहने आपले पाचवे स्थान कायम राखले आहे. त्याच्या खात्यात ८५३ रेटिंग गुण आहेत.
 
दरम्यान, १९ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बुमराहला आपली क्रमवारी आणखी सुधारण्याची संधी मिळणार आहे. या मालिकेसाठी त्याचा भारतीय संघात समावेश आहे. दुसरीकडे, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची एका स्थानाने घसरण झाली असून, तो ६९६ रेटिंग गुणांसह १६ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.