‘देशाची काळजी सुप्रिया सुळे घेतील, तुम्ही आराम करा’

मोदींचा पवारांना खास संदेश

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |
पुणे,
Modi's special message to Pawar राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना दोन दिवसांच्या उपचारांनंतर पुण्यातील रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर ते मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी विश्रांतीसाठी रवाना झाले. यावेळी त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत होत्या. पवार यांना दोन दिवसांपूर्वी कफ आणि थकवा जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करून विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचा नियोजित दुष्काळी पाहणी दौरा आणि इतर कार्यक्रमही रद्द करण्यात आले होते. आता प्रकृती स्थिर झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
 
 
 
e456768870
 
शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पवार यांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी एबीपी माझाशी बोलताना याबाबत माहिती दिली. मोदी यांनी पवार यांच्या तब्येतीची आस्थेने चौकशी करत त्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी, 'शरदराव, तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत. त्यांच्यासोबत आम्ही काम करू. तुम्ही विश्रांती घ्या आणि आम्हाला मार्गदर्शन करत राहा,' अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्याचे मणियार यांनी सांगितले. पवार यांचे आरोग्य चांगले राहावे आणि त्यांचे मार्गदर्शन पुढेही मिळत राहावे, अशी अपेक्षाही मोदी यांनी व्यक्त केल्याचे त्यांनी नमूद केले.
 
 
दरम्यान, डॉक्टरांनी शरद पवार यांना काही दिवस प्रवास आणि दौरे कमी करण्याचा सल्ला दिला आहे. आहाराकडेही विशेष लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे. यापूर्वी झालेल्या ऑपरेशननंतर त्यांना काही काळ द्रवरूप आहार घ्यावा लागत होता. मात्र, एकाच प्रकारचा आहार घेतल्याने त्यांना कंटाळा येत असल्याचे मणियार यांनी सांगितले. आता दूध आणि भाकरी यांसारखा आहार ते हळूहळू घेऊ लागले असून, त्यामुळे अशक्तपणा कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढील दोन ते चार दिवस पवार यांनी पूर्ण विश्रांती घ्यावी, असे डॉक्टरांनी सुचवले आहे. रुग्णालयातून बाहेर येताना पवार व्हीलचेअरवर होते. त्यांनी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या दिशेने हात उंचावून अभिवादन केले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे हात जोडून आभार मानले.