वर्गात अचानक कायमची कोसळली नऊ वर्षांची चिमुकली!

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Nine-year-old girl dies in classroom राजधानी दिल्लीतील मयूर विहार परिसरातील एका शाळेत नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पांडव नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लवली पब्लिक स्कूलमध्ये ही घटना घडली. संबंधित विद्यार्थिनी तिसरीच्या वर्गात शिकत होती. बुधवारी सकाळी वर्गात नेहमीप्रमाणे शिकवणी सुरू असताना अचानक तिची प्रकृती बिघडली आणि ती जमिनीवर कोसळली. हा प्रकार पाहून वर्गातील इतर विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये गोंधळ उडाला. शाळा प्रशासनाने तातडीने तिला उपचारासाठी मलिक रेडिक्स हेल्थ केअर रुग्णालयात दाखल केले.
 
 
 
Nine-year-old girl dies in classroom
 
विद्यार्थिनीला रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिची तपासणी केली. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वर्गातील हा संपूर्ण प्रकार शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नोंदवला गेला आहे. यामध्ये विद्यार्थिनी अचानक कोसळल्याचे आणि शिक्षकांनी तातडीने तिच्या मदतीसाठी धाव घेतल्याचे दिसत आहे. या घटनेमुळे शाळेच्या परिसरात शोककळा पसरली असून, मुलीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
 
 
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात विद्यार्थिनीचा मृत्यू वैद्यकीय कारणांमुळे झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाची किंवा घातपाताची पुष्टी अद्याप झालेली नाही. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून विद्यार्थिनीच्या पालकांसह शाळेतील संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, या घटनेमागील नेमकी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.