लेह,
Notice issued to Wangchuk’s Desert Flower School लडाख प्रशासनाने सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी स्थापन केलेल्या ‘हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह्ज’ (HIAL) संस्थेच्या ‘डेझर्ट फ्लॉवर स्कूल’मधील सर्व शैक्षणिक आणि इतर उपक्रम थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाकडून अंतिम निर्णय येईपर्यंत शाळेचे कामकाज सुरू करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. लेह येथील तहसीलदार कार्यालयाने १ नोव्हेंबर रोजी HIALच्या सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली जे. आंग्मो यांना नोटीस बजावून हे आदेश दिले. गीतांजली या सोनम वांगचुक यांच्या पत्नी आहेत.
प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार, लेहजवळील फ्यांग येथील ‘डेझर्ट फ्लॉवर स्कूल’मध्ये आवश्यक सरकारी परवानगी, संमती किंवा मान्यता न घेताच वर्ग आणि अन्य उपक्रम सुरू करण्यात आले होते. या संदर्भात प्रशासनाने २२ सप्टेंबर रोजीच्या पत्राचाही उल्लेख केला आहे. या पत्राद्वारे आंग्मो यांनी शाळेच्या व्यवस्थापन समितीतील प्रस्तावित सदस्यांसाठी ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती. HIALशी संबंधित प्रकरण सध्या जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने, न्यायालयाचा अंतिम निर्णय किंवा पुढील आदेश येईपर्यंत शाळेचे कामकाज सुरू करण्यासाठी कोणतीही पावले उचलू नयेत, असे तहसीलदारांनी नोटिशीत म्हटले आहे. तसेच सध्याची परिस्थिती कायम ठेवण्याचे आणि न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम होईल, अशी कोणतीही कृती न करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, लडाख प्रशासनाने ऑगस्ट २०२५ मध्ये HIAL संस्थेला दिलेल्या जमिनीचे वाटप रद्द केले होते. या निर्णयाला संस्थेने उच्च न्यायालयात आव्हान दिले असून, त्यावर अद्याप सुनावणी आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शाळेच्या उपक्रमांना स्थगिती देण्यात आली आहे. दुसरीकडे, अलीकडेच लडाखमधील मद्यव्यावसायिकांनीही सोनम वांगचुक यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. मद्यविक्रीच्या मुद्द्यावर वांगचुक यांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप करत, त्यांच्या भूमिकेमुळे स्थानिक व्यावसायिकांच्या हितावर परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले होते.