इंधन दरवाढीचा ट्रम्प यांना फटका!

निकालावर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |
अमेरिका,
president-trump-first-reaction-on-electionअमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने सिनेट आणि हाऊसमध्ये विजय मिळवत रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का दिला आहे. या निकालांमुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उर्वरित अध्यक्षीय कार्यकाळात काँग्रेसवरील डेमोक्रॅट्सचे नियंत्रण प्रस्थापित झाले आहे. रिपब्लिकन पक्षाचे बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या काही मतदारसंघांमध्येही डेमोक्रॅटिक उमेदवारांनी बाजी मारल्याने अमेरिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.
 
donald trump
 
या पराभवावर प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांनी वाढत्या इंधन दरांचा रिपब्लिकन पक्षाला निवडणुकीत फटका बसल्याचे मान्य केले. लोकांना इंधनासाठी अधिक पैसे मोजावे लागले की त्यांना ते आवडत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. फॉक्स न्यूजशी बोलताना ट्रम्प यांनी मात्र या निकालांना आपल्या अध्यक्षपदाला बसलेला धक्का मानण्यास नकार दिला. डेमोक्रॅट्स अनेक वर्षांपासून अशा मोठ्या विजयासाठी प्रयत्न करत होते आणि अखेर त्यांना यश मिळाले, असे सांगत त्यांनी विरोधकांचे अभिनंदनही केले.
 
दरम्यान, न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी मध्यावधी निवडणुकांचे निकाल पूर्णपणे स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. डेमोक्रॅट्ससोबत काम करण्यास आपण उत्सुक असून, दोन्ही पक्ष एकत्र येऊन काही मार्ग काढू शकतात, असेही त्यांनी म्हटले. मात्र, या भूमिकेच्या काही काळ आधीच ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'व्हेटो' असा शब्द लिहिलेल्या टोपीचा फोटो शेअर केला होता. त्यामुळे निकाल स्वीकारण्याच्या त्यांच्या भूमिकेसोबतच आगामी राजकीय संघर्षाचे संकेतही मिळत आहेत.