मुंबई
raj thackeray राज्यात एकीकडे दिवाळीच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या असून खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र, दुसरीकडे राज्यातील ग्रामीण भाग दुष्काळाच्या भीषण संकटाचा सामना करत आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदा शिवाजी पार्कात होणारा मनसेचा पारंपरिक दीपोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांनी ‘एक्स’वर व्हिडीओ प्रसिद्ध करून ही घोषणा केली. दुष्काळामुळे आपले बांधव होरपळत असताना मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करणे मनाला पटत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मनसेकडून दरवर्षी शिवाजी पार्कात भव्य दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. या निमित्ताने संपूर्ण परिसरात आकर्षक रोषणाई केली जाते, तसेच फटाक्यांची आतषबाजीही होते. हा सोहळा पाहण्यासाठी मुंबई, ठाण्यासह राज्याच्या विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. मात्र, यंदा राज्यावर दुष्काळाचे सावट असल्याने हा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे.
राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा उल्लेख करताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र एका विचित्र अवस्थेतून जात आहे. ग्रामीण भागात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून दुष्काळाची तीव्रता मोठी आहे. अशा वेळी आपण शहरांमध्ये मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली, तर दुष्काळाचा सामना करणाऱ्या आपल्या बांधवांना आणि भगिनींना काय वाटेल? त्यांच्या लहान मुलांच्या मनावर काय परिणाम होईल? याचा प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्र्यांनी यंदाचा दुष्काळ १९७२ पेक्षाही भयानक असू शकतो, असे म्हटल्याचा दाखलाही राज ठाकरे यांनी दिला. एवढे गंभीर संकट समोर असतानाही सत्ताधारी पक्षातील काही लोक गरबा खेळण्यात मग्न होते, अशी टीका त्यांनी केली. मात्र, अशा परिस्थितीत भव्य दीपोत्सव साजरा करणे आपल्याला योग्य वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यंदा काळी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आपण करत नसल्याचे सांगत राज ठाकरे यांनी नागरिकांना उत्सवातील अनावश्यक खर्च आणि दिखाव्याला आवर घालण्याची विनंती केली. दिवाळीला घरात कंदील लावा, फराळ तयार करा आणि गरजूंना त्याचे वाटप करा; मात्र मोठ्या प्रमाणावर रोषणाई करणे आणि फटाके फोडणे टाळावे, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील नागरिक म्हणून राज्यावर आणि आपल्या माणसांवर प्रेम असणे महत्त्वाचे आहे. आपले लोक संकटात असताना आपणही उत्सवाचा उत्साह काही प्रमाणात कमी ठेवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.दुष्काळामुळे राज्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे स्थलांतर होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम शहरांवरही जाणवू शकतो, असे राज ठाकरे यांनी नमूद केले. पुढील वर्षी परिस्थिती सुधारेल आणि पुन्हा एकदा सर्वजण मोठ्या उत्साहात शिवाजी पार्कात दीपोत्सव साजरा करू, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.