AI चा गैरवापर भोवला! अभिनेत्री रुपाली गांगुली पोहोचली हायकोर्टात

मॉर्फ केलेले फोटो आणि अश्लील व्हिडीओंविरोधात कायदेशीर लढाई

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |
मुंबई
rupali ganguly ‘अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रुपाली गांगुली सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून आपले बनावट फोटो तयार करणे, व्हिडीओंमध्ये फेरफार करणे आणि परवानगीशिवाय वैयक्तिक छायाचित्रांचा वापर करणे, अशा प्रकारांविरोधात रुपालीने कायदेशीर पाऊल उचलले आहे. याप्रकरणी तिने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काही ऑनलाइन पोर्टल्स तिच्या संमतीशिवाय तिचे फोटो आणि अन्य कंटेंट वापरत असल्याचा आरोप तिने केला आहे. विशेष म्हणजे, AI च्या माध्यमातून तयार करण्यात आलेले काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ अश्लील सामग्री प्रसारित करणाऱ्या वेबसाइट्सवरही वापरले जात असल्याचे तिने याचिकेत म्हटले आहे.
 
 
rupali ganguly
रुपालीने दाखल केलेल्या याचिकेत व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाशी आणि ओळखीशी संबंधित अधिकारांचा मुद्दा उपस्थित केला आहे. कोणत्याही व्यक्तीचे नाव, छायाचित्र, आवाज आणि ओळख यांवर त्या व्यक्तीचा अधिकार असतो. संबंधित व्यक्तीची परवानगी न घेता या गोष्टींचा व्यावसायिक किंवा अन्य चुकीच्या कारणांसाठी वापर करणे हा व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचा भंग असल्याचे अभिनेत्रीने म्हटले आहे. AI तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आलेली बनावट छायाचित्रे आणि एडिट केलेले व्हिडीओ यामुळे आपल्या प्रतिमेला धक्का पोहोचू शकतो, अशी भीतीही तिने व्यक्त केली आहे.
 
 
या प्रकारच्या कंटेंटचा प्रसार रोखण्यात यावा आणि आपल्या ओळखीचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रुपालीने न्यायालयाकडे केली आहे. या याचिकेवर ४ नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी येणार असून, अभिनेत्रीने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर न्यायालय काय भूमिका घेते, याकडे मनोरंजनविश्वाचे लक्ष लागले आहे.
 
 
दरम्यान, AI आणि डीपफेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अभिनेत्रींना लक्ष्य करण्याचे प्रकार यापूर्वीही समोर आले आहेत. अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू हिनेही अशाच प्रकारच्या गैरवापराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. काही वेबसाइट्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स तिचे फोटो, आवाज आणि ओळखीचा वापर करून AI च्या मदतीने बनावट व्हिडीओ, मॉर्फ केलेली छायाचित्रे आणि अश्लील कंटेंट तयार करत असल्याचा आरोप तिने केला होता. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित अधिकारांचे संरक्षण व्हावे, यासाठी तिने न्यायालयाकडे दाद मागितली होती.
सामंथाच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने तिला अंतरिम दिलासा दिला होता. गुगल, मेटा आणि अन्य ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सना तिच्या ओळखीचा गैरवापर करणारा याचिकेत नमूद केलेला कंटेंट हटवण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे AI तंत्रज्ञानाचा वापर करून कलाकारांच्या डिजिटल ओळखीशी छेडछाड करण्याच्या प्रकारांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
 
 
यापूर्वी अभिनेत्री प्रीती झिंटानेही AI च्या मदतीने तयार करण्यात आलेले डीपफेक व्हिडीओ आणि मॉर्फ केलेल्या छायाचित्रांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिचे आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणारे फोटो व व्हिडीओ ऑनलाइन प्रसारित केले जात असल्याचा मुद्दा तिने उपस्थित केला होता. अशा प्रकारच्या कंटेंटचा प्रसार रोखण्याची मागणी तिने केली होती. त्यानंतर न्यायालयाने संबंधित ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सना आक्षेपार्ह सामग्री हटवण्याचे निर्देश दिले होते.
AI तंत्रज्ञानाचा झपाट्याने विस्तार होत rupali ganguly  असताना त्याच्या गैरवापराचा प्रश्नही गंभीर बनत आहे. एखाद्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय तिचे फोटो, आवाज किंवा व्हिडीओ बदलून त्यांना आक्षेपार्ह स्वरूप देणे आता तंत्रज्ञानाच्या मदतीने सहज शक्य झाले आहे. विशेषतः चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या लोकप्रियतेचा फायदा घेत त्यांच्या डिजिटल ओळखीचा गैरवापर होण्याचे प्रकार वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. रुपाली गांगुलीने दाखल केलेल्या याचिकेमुळे पुन्हा एकदा व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे आणि डिजिटल ओळखीच्या संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. आता ४ नोव्हेंबरच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.