दिवाळीच्या आनंदोत्सवात अंत्योदय महिलांना साडीची भेट!

जिल्ह्यात 83 हजार 494 साड्या प्राप्त, नोव्हेंबरच्या रेशनसोबत होणार वाटप

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |
प्रमोदकुमार नागनाथे
गोंदिया
saree-gift diwali दिवाळीचा सण म्हटला की नवा उत्साह, नवी खरेदी आणि आनंदाची उधळण! यंदाच्या दिवाळीत अंत्योदय योजनेतील गरीब व गरजू कुटुंबांमधील महिलांचाही आनंद द्विगुणित होणार आहे. राज्य शासनाच्या कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील महिलांना दिवाळीची भेट म्हणून साडी देण्यात येणार आहे. यासाठी गोंदिया जिल्ह्यासाठी तब्बल 83 हजार 494 साड्या प्राप्त झाल्या असून, नोव्हेंबर महिन्याच्या रेशनसोबत या साड्यांचे वितरण केले जाणार आहे.
 
saree gift
दिवाळीच्या सणात प्रत्येक कुटुंबाला नव्या कपड्यांची ओढ असते. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे अनेक गरीब कुटुंबांना सणासुदीची खरेदी करणे शक्य होत नाही. अशा कुटुंबांतील महिलांसाठी शासनाची ही साडी वाटप योजना दिलासादायक ठरणार आहे. अंत्योदय योजनेच्या पात्र शिधापत्रिकाधारक कुटुंबाला एक साडी याप्रमाणे वितरण केले जाणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झालेल्या साड्या तालुकानिहाय रेशन दुकानांमध्ये पाठविण्यात येत आहेत. आतापर्यंत 38 हजार 929 साड्या तालुका स्तरावर पाठविण्यात आल्या आहेत. शासनाने निश्चित केलेल्या लाभार्थी शिधापत्रिकांच्या संख्येनुसार संबंधित रेशन दुकानांमधून साड्यांचे वाटप होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सदर साड्यांचे वाटप यापूर्वीच होणे अपेक्षित होते. मात्र, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेमुळे साडी वाटपाची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. त्यामुळे महिलांना साड्यांसाठी प्रतीक्षा करावी लागली. आता वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्याने दिवाळीच्या निमित्ताने मिळणारी ही भेट महिलांच्या आनंदात भर घालणार आहे.
तालुकानिहाय साड्यांची उपलब्धता...
शासनाकडून प्राप्त झालेल्या साड्यांमध्ये आमगाव तालुक्यासाठी 8 हजार 771, अर्जुनी मोरगाव 11 हजार 51, देवरी 8 हजार 923, गोंदिया 16 हजार 571, गोरेगाव 10 हजार 63, सडक अर्जुनी 8 हजार 988, सालेकसा 7 हजार 732 आणि तिरोडा तालुक्यासाठी 11 हजार 395 साड्या उपलब्ध झाल्या आहे.
शासनाकडून गेल्या वर्षापासून दिवाळीच्या निमित्ताने कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना साडीचे वाटप केले जात आहे. या साड्यांचे तालुकानिहाय वितरण करण्यात येत असून, नोव्हेंबर महिन्याच्या रेशनसोबत अंत्योदय योजनेच्या पात्र शिधापत्रिकाधारक कुटूंबाला प्रत्येकी एक प्रमाणे साडीचे वाटप केले जाणार आहे.
- प्रकाश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी, गोंदिया