पुणे,
Sharad Pawar discharged राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना बुधवारी (४ नोव्हेंबर) पुण्यातील रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. हवामानातील अचानक झालेल्या बदलामुळे त्यांना छातीत कफ आणि अशक्तपणा जाणवू लागला होता. त्यावेळी ते दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर होते. मात्र, प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांचा दौरा रद्द करण्यात आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्या विविध तपासण्या करून उपचार केले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर बुधवारी त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी रवाना झाले. पुढील काही दिवस ते तेथेच विश्रांती घेणार आहेत. डॉक्टरांनी त्यांना सध्या प्रवास आणि धावपळ टाळून आराम करण्याचा सल्ला दिला आहे. पवार यांना घरी घेऊन जाण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे रुग्णालयात उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत प्रतिभा पवारही होत्या. दोन दिवसांच्या उपचारांनंतर प्रकृती स्थिर झाल्याने पवार यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. त्यांच्या प्रकृतीमुळे यापूर्वीचे नियोजित कार्यक्रमही रद्द करण्यात आले होते.
रुग्णालयातून बाहेर पडताना शरद पवार यांना व्हीलचेअरवरून आणण्यात आले. यावेळी परिसरात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पाहून त्यांनी हात उंचावत अभिवादन केले. त्यानंतर ते कारमधून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, रुग्णालयातून निघण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह संपूर्ण वैद्यकीय कर्मचारी वर्गाचे हात जोडून आभार मानले. पवार यांची प्रकृती आता स्थिर असून, पुढील काही दिवस त्यांना विश्रांती घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले आहे.