ऊसाच्या पहिल्या उचलीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |
मुंबई
sugarcane farmers protes ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४ हजार ५०० रुपये पहिली उचल मिळावी, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन तीव्र केले आहे. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमधील किणी टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले असतानाच, त्यांच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला आहे. गेल्या २२ तासांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान, आंदोलनादरम्यान काही ट्रकचालकांना मारहाण झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
 

sugarcane farmers protest 

तोडगा निघेपर्यंत महामार्गावरून हटणार नाही
ऊस दराच्या प्रश्नावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने व्यक्त केला आहे. राजू शेट्टी यांच्याकडून पुढील आदेश मिळेपर्यंत आंदोलक महामार्गावरून हटणार नसल्याची भूमिका घेण्यात आली आहे. सरकारने साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) प्रतिकिलो ५० रुपये करावी, तसेच इथेनॉलच्या दरात १२ रुपयांची वाढ करून तो प्रतिलिटर ७० रुपये करावा, अशा मागण्याही संघटनेने केल्या आहेत.
राज्य सहकारी बँकेने साखरेचे मूल्य प्रतिक्विंटल ४ हजार २०० रुपये निश्चित केले असतानाही सर्वपक्षीय साखर कारखानदार एकत्र येऊन शेतकऱ्यांना योग्य पहिली उचल देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अनिल पवार यांनी केला आहे. कोल्हापूरमधील आंदोलनावर तोडगा निघेपर्यंत आणि राजू शेट्टी यांचा पुढील आदेश येईपर्यंत महामार्गावरील आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 

महामार्गावर वाहनांच्या रांगा
सातारा जिल्ह्यातील नागठाणे गावच्या हद्दीत आंदोलकांनी पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या दिल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. ऊसाला प्रतिटन ४ हजार ५०० रुपये पहिली उचल मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
 
 

भाजीपाला आणि दूध रोखण्याचा इशारा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दर आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. कोल्हापूरमधील किणी टोलनाक्यावर राजू शेट्टी यांचे ठिय्या आंदोलन सुरू असून, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आजच्या दिवसात मागण्यांवर तोडगा न निघाल्यास मुंबईकडे जाणारा भाजीपाला आणि दूध रोखण्यात येईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
 
 
अमरावतीत फायनान्स कंपनीविरोधातही कारवाई
दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एका फायनान्स कंपनीविरोधात आंदोलन केले. निंबोरा बोडखा येथे कांबळे कुटुंबाच्या घराला फायनान्स कंपनीने सील ठोकले होते. त्यामुळे रवी कांबळे आणि राजकुमार कांबळे यांच्या कुटुंबीयांना घरात प्रवेश करता येत नसल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कपिल पडघान यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी हातोड्याच्या साहाय्याने घराचे सील तोडण्यात आले. ऊस दराच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनासोबतच शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवरही संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्याचे या घटनेतून दिसून आले.