पुणे,
The Yal Zambare Case मुकुंदनगर येथील पायल झांबरे यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला असून, फरार असलेल्या सासू आणि सासऱ्याला अटक करण्यात आली आहे. अरविंद झांबरे आणि मंगल झांबरे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यापूर्वीच पोलिसांनी पायल यांचे पती अक्षय झांबरे याला अटक केली होती. त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पतीसह सासू, सासरे आणि नणंद अक्षता यांच्याविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासू-सासऱ्यांना अटक झाल्यानंतर आता या प्रकरणातील कौटुंबिक वाद आणि छळाच्या आरोपांबाबत तपासातून काय माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.
पायल यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून त्यांच्याकडे पैशांसह सोन्याची मागणी केली जात होती. दरवर्षी दिवाळीच्या काळात माहेरून पाच ते दहा तोळे सोने आणण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप आहे. यंदाही अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, पायल यांचे माहेरचे कुटुंब शेतकरी असून दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांना ही मागणी पूर्ण करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी पुढील हंगामापर्यंत वेळ मागितला होता. तरीही पायल यांचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू असल्याचा दावा नातेवाइकांनी केला आहे. १ नोव्हेंबर रोजी सासूशी वाद झाल्यानंतर पायल घरातून निघून गेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. याच दिवशी त्यांनी भावाला संदेश पाठवून आपल्या मृत्यूला सासू जबाबदार असल्याचे म्हटल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, २ नोव्हेंबर रोजी पुण्यातील मुकुंदनगर परिसरातील अक्षय हाइट्स सोसायटीमधील फ्लॅटमध्ये पायल मृतावस्थेत आढळल्या. घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट आढळली नसल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे, पायल यांच्या माहेरच्या नातेवाइकांनी हा आत्महत्येचा प्रकार नसून घातपाताची शक्यता असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणात पती अक्षय झांबरे, सासू मंगल अरविंद झांबरे, सासरे अरविंद झांबरे आणि नणंद अक्षता यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सोन्याच्या मागणीसह छळ केल्याचे आरोप, पायल यांनी मृत्यूपूर्वी पाठवलेला संदेश आणि त्यांच्या मृत्यूमागील परिस्थिती या सर्व बाबींचा तपास आता पोलीस करत आहेत.