बॉलिवूडच्या सेलिब्रिटींना धमक्यांचे सत्र; आयुष्मान खुरानाही लक्ष्य!

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |
मुंबई,
Threat to Ayushmann Khurrana मायानगरी मुंबईतील बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता अभिनेता आयुष्मान खुराना यालाही धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. आयुष्मानला धमकी देणारा ऑडिओ संदेश पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी अभिनेता तुषार कपूर यालाही धमकी मिळाल्याचे प्रकरण समोर आले होते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एकापाठोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे चित्रपटसृष्टीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
 
Threat to Ayushmann Khurrana
 
 
आयुष्मान खुराना याला मिळालेल्या धमकीच्या ऑडिओ संदेशाची पोलिसांकडून तांत्रिक तपासणी सुरू आहे. या प्रकरणात अद्याप अधिकृत प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल झालेला नसला, तरी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत त्याचा चालक आणि आणखी एक व्यक्ती गोळी लागून जखमी झाले होते. या घटनेने मुंबईतील कलाकारांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.
 
 
सलग घडणाऱ्या धमकीच्या घटनांची दखल घेत मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील अनेक प्रसिद्ध कलाकार आणि राजकीय नेत्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. यामध्ये अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, रणवीर सिंह आणि आमिर खान यांच्यासारख्या बड्या कलाकारांचा समावेश आहे. धमकीचे संदेश आणि गोळीबाराच्या घटनांमुळे मनोरंजन क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.