मूल
tiger-attack शेतात कापूस वेचणी करीत असलेल्या शेतकर्यावर वाघाने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. ही घटना तालुक्यातील दाबगाव मक्ता परिसरात वनविभागाच्या कक्ष क्रमांक 30 मध्ये घडली. सुनील मोतीराम कोडापे (50), रा. चक कन्हळगाव) असे गंभीर जखमी शेतकर्याचे नाव आहे.
सुनील कोडापे हे 8 ते 10 मजुरांसह शेतात कापूस वेचणीसाठी गेले होते. कापूस वेचणीचे काम सुरू असताना वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे सुनील कोडापे यांना स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. वाघाच्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, जवळच काम करीत असलेल्या इतर मजुरांनी आरडाओरड केल्याने वाघ घटनास्थळावरून पळून गेला. घटनेची माहिती कळताच वनपाल मनीष निमकर, वनरक्षक कवळे आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी सुनील कोडापे यांना त्वरित मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, चिचपल्ली वनपरिक्षेत्राच्या वनक्षेत्राधिकारी स्वाती महेशकर यांनी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी शेतकर्याची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच वनविभागाच्या वतीने त्यांना तातडीची आर्थिक मदत म्हणून 10 हजार रुपये देण्यात आले. या घटनेने दाबगाव मक्ता, चक कन्हळगाव व परिसरातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.