तीन जणांचा बळी घेणारा वाघ अखेर जेरबंद

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |
चिमूर
tiger captured तीन जणांचा बळी घेऊन दहशत निर्माण करणार्‍या त्रिशुल वाघाला अखेर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने जेरबंद केले आहे. ब्रह्मपुरी वनविभागातील चिमूर वनपरिक्षेत्रात गेल्या पंधरा दिवसांपासून या वाघाचा माग काढला जात होता. अत्यंत सावधपणे वावरणार्‍या या वाघाला अखेर 3 नोव्हेंबरच्या मध्यरात्री बेशुद्ध करून ताब्यात घेण्यात वनविभागाला यश आले. या कारवाईमुळे जंगलालगतच्या गावांमधील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
 
tiger 1
या वाघाने गरडापार येथील सदाशिव चिरकुटा खडसंग (50) यांना 30 ऑक्टोबर 2026 रोजी दूपारी 12.30 वाजताच्या सुमारास संरक्षित वन कक्ष क्रमांक 380 मध्ये हल्ला करुन ठार केले होते. या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतजमीनी असून, सध्या शेतात कापूस वेचणीचे कामे सुरु आहे. मात्र हा वाघ या परिसरात फिरत असल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले होते. तसेच, यापूर्वी खडसंगी (बफर) परिसरात सुध्दा मानवहानीच्या दोन घटना याच वाघाच्या उपस्थितीमुळे घडल्या. तसेच या वाघाने पाळीव प्राण्यांना ठार केल्याने गावकर्‍यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष उद्भवू नये याकरीता या वाघास जेरबंद करणे आवश्यक झाले होते.
 
दरम्यान, 3 नोव्हेंबर रोजी चिमूर वनपरिक्षेत्रातील चिमूर नियतक्षेत्राच्या गदगाव बीटमधील कक्ष क्रमांक 380 येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व निशाणेबाज अजय मराठे यांनी वाघाला बेशुध्द करुन जेरबंद केले. ही मोहिम ब्रह्मपुरीचे जीवशास्त्रज्ञ राकेश आहुजा, विकास ताजणे, योगेश लडके, प्रफुल वाटगुरे, गुणनक धोरे, दिपेश टेंभुणे, वशीम शेख, अमोल कोरपे, अक्षय दांडेकर व संपुर्ण आरआरटी चमू यांच्या उपस्थितीत पार पाडली.
जेरबंद करण्यात आलेल्या वाघाचे वय अंदाजे 5 वर्ष असून, त्याला पुढील उपचाराकरिता ब्रम्हपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी एस. आर. यांच्या मार्गदर्शनात ब्रम्हपुरी येथील टीटीसी सेंटर येथे स्थलांतरित करण्यात आले.