मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांची कोंडी; ओबामांचा बदलाचा संदेश!

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Trump's dilemma in the midterm elections अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीच्या निकालांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का बसला असून सिनेट आणि प्रतिनिधीगृहात डेमोक्रॅटिक पक्षाने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. प्रतिनिधीगृहातील ४३५ जागांपैकी आतापर्यंत ३४५ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यापैकी डेमोक्रॅटिक पक्षाने २१९ जागांवर विजय मिळवला असून रिपब्लिकन पक्षाला १२६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. सिनेटमध्येही डेमोक्रॅटिक पक्षाने ५३ जागा जिंकल्या आहेत, तर रिपब्लिकन पक्षाला ४१ जागा मिळाल्या आहेत. या निकालांनंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांच्या राजकीय भूमिकेवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
 
 
 
obama
 
ओबामा यांनी अमेरिकेतील मतदारांनी या निवडणुकीतून स्पष्ट संदेश दिल्याचे म्हटले आहे. देशातील नागरिकांना समाजात फूट पाडणारे राजकारण नको असून लोकांना एकत्र आणणारे नेतृत्व हवे आहे. जनतेसमोरील प्रश्नांवर ठोस उपाय मांडणाऱ्या नेतृत्वाला मतदारांनी पसंती दिल्याचे त्यांनी नमूद केले. देशाच्या विविध भागांतून वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे आणि विचारसरणीचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. यामध्ये यापूर्वी विजय मिळवणे कठीण मानल्या जाणाऱ्या मतदारसंघांतील उमेदवारांचाही समावेश होता. सार्वजनिक सेवेवरील विश्वास, समान मूल्ये आणि आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची भूमिका या मुद्द्यांनी या उमेदवारांना एकत्र आणले. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेणारे दोन्ही पक्षांतील हजारो निवडणूक अधिकारी आणि स्वयंसेवक यांचेही ओबामा यांनी आभार मानले.
 
 
ट्रम्प प्रशासनाचा कार्यकाळ अद्याप दोन वर्षे शिल्लक असला, तरी या निकालानंतर नव्या जोमाने काम करण्याची गरज असल्याचे ओबामा यांनी म्हटले आहे. ज्या ठिकाणी बदल घडवून आणण्याची संधी आहे, तिथे आवश्यक सुधारणा करणे, भविष्यातील नुकसान टाळणे आणि देशाच्या पुढील वाटचालीसाठी मजबूत पाया तयार करणे हे आता महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मध्यावधी निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या कामगिरीकडे ट्रम्प प्रशासनासाठी मोठा राजकीय इशारा म्हणून पाहिले जात आहे. अमेरिकेतील मतदारांनी दिलेला हा कौल आगामी दोन वर्षांच्या राजकीय घडामोडींवर काय परिणाम करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.