पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप भत्त्यात सात हजारांची वाढ

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |

मुंबई,
veterinary-internship-stipend-hikeपशुवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना दिलासा देत राज्य शासनाने त्यांच्या आंतरवासिता निर्वाह भत्त्यात सात हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना यापुढे दरमहा ११ हजारांऐवजी १८ हजार रुपये भत्ता मिळणार आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 
pashusamvardhan
 
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय पशुचिकित्सा परिषदेच्या निर्देशानुसार पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम टप्प्यात एक वर्षाची आंतरवासिता पूर्ण करणे अनिवार्य आहे. या कालावधीत राज्याच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत पशुचिकित्सालयांमध्ये आंतरवासिता पशुवैद्यक म्हणून विद्यार्थ्यांना सेवा द्यावी लागते. या काळात निवास, भोजन आणि प्रवासाच्या खर्चासाठी शासनाकडून यापूर्वी दरमहा ११ हजार रुपये निर्वाह भत्ता दिला जात होता.
 
वाढत्या खर्चाचा विचार करून हा भत्ता १८ हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये १५ हजार रुपये राज्य शासनाकडून, तर उर्वरित तीन हजार रुपये भारतीय कृषी संशोधन परिषद आणि महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या निधीतून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून केवळ पहिल्या सहा महिन्यांसाठी निधी मिळत असल्याने उर्वरित सहा महिन्यांचा तीन हजार रुपयांचा हिस्सा विद्यापीठाच्या स्वनिधीतून देण्यात येणार आहे.
 
या निर्णयामुळे पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांना आर्थिक आधार मिळण्याबरोबरच ग्रामीण भागातील पशुचिकित्सालयांमध्ये सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालकांना पशुधनाच्या उपचारासाठी अधिक मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.