नवी दिल्ली,
virat-sets-a-world-record भारतीय क्रिकेटचा स्टार फलंदाज विराट कोहली याने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची ताकद सिद्ध करत महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करण्याचा मान आता कोहलीच्या नावावर झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ७४ धावांची खेळी करत त्याने हा ऐतिहासिक टप्पा गाठला.
४ नोव्हेंबर रोजी झालेल्या सामन्यात कोहलीने ७४ धावा फटकावताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना आपल्या एकूण धावांची संख्या ८ हजार ७४१ वर नेली. यासह त्याने सचिन तेंडुलकरचा ८ हजार ७२० धावांचा विक्रम मागे टाकला. त्यामुळे या प्रकारात धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून कोहलीने नवा इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे, हा विक्रम गाठण्यासाठी कोहलीला सचिनच्या तुलनेत खूप कमी डाव खेळावे लागले. कोहलीने १८० सामन्यांतील १६९ डावांमध्ये ८ हजार ७४१ धावा केल्या आहेत. तर सचिनने २४२ सामन्यांतील २३२ डावांमध्ये ८ हजार ७२० धावा जमवल्या होत्या.
फलंदाजीच्या सरासरीतही कोहलीने आघाडी घेतली आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना त्याची सरासरी ६६.२१ इतकी असून सचिनची सरासरी ४२.३३ होती. कोहलीने या काळात ३० शतके आणि ४६ अर्धशतके झळकावली आहेत. दुसरीकडे, सचिनच्या नावावर १७ शतके आणि ५२ अर्धशतके आहेत. स्ट्राइक रेटच्या बाबतीतही कोहलीने ९५.०३ च्या कामगिरीसह सचिनच्या ८८.४४ या आकड्याला मागे टाकले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कोहलीने आणखी एक महत्त्वपूर्ण कामगिरी नोंदवली. परदेशातील एकदिवसीय सामन्यांमध्ये ५० किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा त्याचा हा ५० वा प्रसंग ठरला. परदेशात खेळलेल्या १२८ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत २१ शतके आणि २९ अर्धशतके केली आहेत.
दरम्यान, पावसाच्या व्यत्ययामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार भारतीय संघाला ३२ षटकांत विजयासाठी १४३ धावांचे लक्ष्य मिळाले होते. सुरुवातीला विकेट गमावल्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी डावाची जबाबदारी सांभाळली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. गिलने ३७ धावांचे योगदान दिले, तर कोहलीने ७४ धावा करत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ८० वे अर्धशतक पूर्ण केले. भारतीय फलंदाजांनी २२.४ षटकांत पाच विकेट गमावत विजयाचे लक्ष्य गाठले. या विजयामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. कोहलीच्या विक्रमी खेळीमुळे भारताचा विजय अधिकच खास ठरला.