विराटचा ऐतिहासिक १३ हजारांचा टप्पा!

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |
ऑकलंड,
virats-historic-13000-run-milestone भारतीय क्रिकेटचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणखी एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात कोहलीने हा अनोखा पराक्रम केला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १३ हजार धावांचा टप्पा पार करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.

virats-historic-13000-run-milestone
ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी करताना १८५ धावांवर सर्वबाद झाला. भारतीय संघाला विजयासाठी १८६ धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र, धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर रोहित शर्मा पहिल्याच षटकात अवघ्या एका धावेवर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या विराट कोहलीने आपल्या खेळीत १२ धावा पूर्ण करताच १३ हजार धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला.
या कामगिरीसह कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांच्या यादीत आणखी एक विक्रम स्वतःच्या नावावर केला. यापूर्वी सचिन तेंडुलकरने एकाच फलंदाजीच्या स्थानावर १३ हजार किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा पराक्रम केला होता. आता विराट कोहलीनेही ही कामगिरी करून आपले नाव विक्रमांच्या यादीत कोरले आहे.
कोहलीने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर २५४ सामने खेळले असून, त्यातील २५१ डावांमध्ये फलंदाजी केली आहे. या स्थानावर त्याने ६१ च्या सरासरीने १३ हजार ५ धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर १० हजारांपेक्षा अधिक धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग हा कोहलीव्यतिरिक्त एकमेव फलंदाज आहे.
तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहली १३ हजार ५ धावांसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग १२ हजार ६६२ धावांसह दुसऱ्या, श्रीलंकेचा कुमार संगकारा ९ हजार ७४७ धावांसह तिसऱ्या, दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस ७ हजार ७७४ धावांसह चौथ्या, तर न्यूझीलंडचा केन विल्यमसन ६ हजार ५०४ धावांसह पाचव्या स्थानावर आहे.
दरम्यान, विराट कोहलीने या सामन्यात केवळ फलंदाजीतच नव्हे, तर क्षेत्ररक्षणातही आपली चमक दाखवली. अंशुल कंबोजच्या गोलंदाजीवर दुसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या कोहलीने नॅथन स्मिथचा एका हाताने अप्रतिम झेल टिपला. त्याच्या या कामगिरीनंतर भारतीय खेळाडूंनीही मैदानावर आनंद व्यक्त केला. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील दमदार कामगिरीमुळे कोहलीने पहिल्याच सामन्यात पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले.