विराटची झेप अन् धोनीचा विक्रम ध्वस्त!

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |
ऑकलंड,
virats-leapand-dhonis-record-shattered भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही आपली छाप पाडली. विराट कोहलीने स्लिपमध्ये घेतलेल्या एका अप्रतिम झेलमुळे एम.एस. धोनीचा विक्रम मोडीत काढला. त्याच्या या झेलचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
 
virat
 
भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत न्यूझीलंडचा डाव अवघ्या १८५ धावांवर रोखला. यादरम्यान रोहित शर्माने अचूक क्षेत्ररक्षण करत शानदार धावबाद केले, तर विराट कोहलीने आपल्या चपळाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
 
 
न्यूझीलंडच्या डावातील २९व्या षटकात अंशुल कंबोज गोलंदाजी करत होता. त्याच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर नॅथन स्मिथने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटची कड घेत दुसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीच्या दिशेने गेला. विराटने क्षणाचाही विलंब न करता उजवीकडे झेप घेत एका हाताने अप्रतिम झेल टिपला. झेल घेतल्यानंतर त्याचा आनंद मैदानावर स्पष्टपणे दिसून आला. तिसऱ्या पंचांनी रिप्ले तपासल्यानंतर झेल योग्य असल्याचे स्पष्ट झाले आणि नॅथन स्मिथला माघारी परतावे लागले.
 
या झेलसह विराटने माजी भारतीय कर्णधार एम.एस. धोनीचा विक्रम मागे टाकला. न्यूझीलंडमध्ये झेल घेणारा विराट हा सर्वाधिक वयाचा भारतीय खेळाडू ठरला आहे. धोनीने वयाच्या ३७ वर्षे २१८ दिवसांनी न्यूझीलंडमध्ये झेल घेतला होता. तर विराटने ३७ वर्षे ३६४ दिवसांचे असताना हा पराक्रम केला.
 
दरम्यान, भारतीय वेगवान गोलंदाजांनीही सामन्यात वर्चस्व गाजवले. चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा निर्णय यशस्वी ठरला. अर्शदीप सिंगने १० षटकांत चार फलंदाजांना बाद केले, तर गुरनूर ब्रारने तीन विकेट्स मिळवल्या. अंशुल कंबोजने दोन बळी घेतले. आकिब नबीला विकेट मिळाली नसली, तरी नव्या चेंडूने त्याने न्यूझीलंडच्या फलंदाजांना धावा काढण्यासाठी संघर्ष करायला लावला. अशा प्रकारे भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे न्यूझीलंडचा डाव १८५ धावांवर आटोपला.