धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस सश्रम कारावास

सात लाख रुपयांची भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |
वाशीम,
washim-news हातउसने घेतलेले पाच लाख रुपये परत करण्यासाठी दिलेला धनादेश बँकेत न वटल्याने एका व्यक्तीस एक महिना साधा कारावास आणि सात लाख रुपये भरपाई देण्याची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. हा महत्त्वपूर्ण निकाल वाशीम येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. ढेंबरे यांनी दिला. फिर्यादी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. आय. आर. विश्वकर्मा यांनी न्यायालयात बाजू मांडली.वाशीम येथील पाटणी कमर्शियल कॉम्प्लेसमध्ये शिवराज ट्रेडर्स या नावाने डाळींचा व्यवसाय करणारे श्याम सखाराम ठाकरे यांची हिंगोली येथील व्यावसायिक विजय प्रकाश भालेराव यांच्याशी मैत्रीपूर्ण ओळख होती.
 
 
 
विजय भालेराव यांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच वैयक्तिक अडचणींसाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी श्याम ठाकरे यांच्याकडे पाच लाख रुपयांच्या हातउसने रकमेची मागणी केली होती. ठाकरे यांनी विश्वास ठेवून ७ सप्टेंबर २०१७ रोजी पाच लाख रुपयांची रक्कम त्यांना दिली. ही रक्कम दीड वर्षात परत करण्याचे भालेराव यांनी मान्य केले होते. मात्र, ठरलेली मुदत उलटून गेल्यानंतरही वारंवार मागणी करून रक्कम परत मिळाली नाही. अखेर भालेराव यांनी ३ जुलै २०१९ रोजी सिंडिकेट बँकेच्या हिंगोली शाखेचा पाच लाख रुपयांचा धनादेश ठाकरे यांना दिला. श्याम ठाकरे यांनी हा धनादेश वटवण्यासाठी बँकेत जमा केला असता, खात्यात पुरेशी शिल्लक नसल्याने ४ जुलै २०१९ रोजी धनादेश अनादरित होऊन परत आला. त्यानंतर ठाकरे यांनी १० जुलै २०१९ रोजी कायदेशीर नोटीस बजावली. ही नोटीस १२ जुलै रोजी मिळूनही ठरलेल्या मुदतीत रकमेचा भरणा करण्यात आला नाही. त्यामुळे ठाकरे यांनी वाशीम येथील न्यायालयात कलम १३८ अन्वये फौजदारी खटला दाखल केला.सुनावणीदरम्यान फिर्यादीने न्यायालयात स्वतःची साक्ष नोंदवून बँक मेमो, नोटीसची पावती, कृषी उत्पन्न बाजार समितीतील माल विक्रीच्या पावत्या आणि प्राप्तिकर विवरणपत्रे यासह आवश्यक ते भक्कम पुरावे सादर केले.
 
 
न्यायालयाने सर्व कायदेशीर बाबी आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद तपासून पाहिले. आरोपीने केलेला कोर्‍या धनादेशाच्या गैरवापराचा दावा सिद्ध करण्यात आरोपी पक्ष असमर्थ ठरला. अखेर न्यायालयाने विजय भालेराव यांना दोषी ठरवून एक महिन्याचा साधा कारावास आणि दोन महिन्यांच्या आत सात लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले. भरपाई न दिल्यास आरोपीला आणखी एका महिन्याची साधी कैद भोगावी लागणार असल्याचे निकालात स्पष्ट करण्यात आले आहे.