नवी दिल्ली,
golden-opportunity-for-virat विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेची सुरुवात धडाकेबाज फलंदाजीने केली आहे. पहिल्याच सामन्यात त्याने ५१ चेंडूंमध्ये १३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७४ धावांची खेळी साकारली. या खेळीसह कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १३ हजार धावांचा टप्पा ओलांडला. आता त्याच्यासमोर आणखी एका खास विक्रमाची संधी असून, त्यासाठी त्याला केवळ एक अर्धशतकी खेळी करावी लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याच्या विक्रमात सध्या विराट कोहली, पाकिस्तानचा बाबर आझम आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांची बरोबरी आहे. या तिघांनीही न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी २७ वेळा ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. त्यामुळे आगामी सामन्यात आणखी एक अर्धशतक झळकावल्यास कोहली या दोघांना मागे टाकून या विक्रमात अव्वल स्थानावर पोहोचू शकतो.
न्यूझीलंडविरुद्ध कोहलीची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली आहे. त्याने आतापर्यंत तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून ६१ सामने खेळले असून ४७.६६ च्या सरासरीने ३२४१ धावा केल्या आहेत. यामध्ये १० शतके आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे. दुसरीकडे, बाबर आझमने न्यूझीलंडविरुद्ध पाच शतके आणि २२ अर्धशतके झळकावली आहेत. तर रिकी पाँटिंगनेही या संघाविरुद्ध २७ वेळा पन्नासहून अधिक धावांची नोंद केली आहे.
या विक्रमांच्या यादीत इंग्लंडचा जो रूट २६ वेळा पन्नासहून अधिक धावा करून चौथ्या क्रमांकावर आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने न्यूझीलंडविरुद्ध २५ वेळा अशी कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस २४ वेळा पन्नासहून अधिक धावा करत या यादीत पुढे आहे.
दरम्यान, कोहलीच्या नजरा केवळ बाबर आझमच्या विक्रमावरच नाहीत, तर सचिन तेंडुलकरच्या आणखी एका मोठ्या विक्रमावरही आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी करण्याच्या बाबतीत कोहली सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत ८९ वेळा शतकी भागीदारीत योगदान दिले आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर ९९ शतकी भागीदारींची नोंद आहे. त्यामुळे आगामी काळात सातत्यपूर्ण फलंदाजी करत कोहलीला सचिनचा हा विक्रमही मोडण्याची संधी आहे.