ढाका,
india-wins सॅफ चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाने पाकिस्तानला ३-२ असे पराभूत करत स्पर्धेची शानदार सुरुवात केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या या चुरशीच्या लढतीत भारतीय खेळाडूंनी पहिल्या हाफमध्ये आक्रमक खेळ करत तीन गोलची आघाडी मिळवली होती. मात्र, सामन्याच्या अखेरच्या क्षणी पाकिस्तानने दोन गोल करत भारतीय संघावर दबाव निर्माण केला. तरीही भारताने आपली आघाडी कायम राखत विजयावर शिक्कामोर्तब केले आणि स्पर्धेतील तीन गुण आपल्या खात्यात जमा केले. या सामन्याचे थेट प्रक्षेपण व्हेटोवर करण्यात आले.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानच्या बचावफळीवर दबाव निर्माण केला. १३ व्या मिनिटाला मुहम्मद सोहेलने डाव्या बाजूने वेगाने आगेकूच करत गोलसमोर चेंडू दिला. याचा अचूक फायदा घेत सुहेल भटने चेंडू गोलजाळ्यात पाठवला आणि भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अवघ्या सहा मिनिटांत भारताने दुसरा गोल केला. १९ व्या मिनिटाला सूर्यकुमार यादवने मध्यभागातून सुंदर चाल रचत चेंडू सुहेल भटपर्यंत पोहोचवला. भटने संधीचे सोने करत गोलच्या उजव्या कोपऱ्यात चेंडू मारला. त्यामुळे भारताची आघाडी २-० झाली.
भारतीय संघाचा आक्रमक खेळ पुढेही कायम राहिला. ३२ व्या मिनिटाला नुफलने चेंडूवर नियंत्रण मिळवत किपगेनला पास दिला. किपगेनने अचूक फटका मारत भारतासाठी तिसरा गोल नोंदवला. दरम्यान, पाकिस्तानला पेनल्टीच्या माध्यमातून गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र, शायक दोस्तला या संधीचा फायदा घेता आला नाही. त्याचा फटका गोलपोस्टच्या बाहेर गेल्याने पहिल्या हाफअखेर भारताने ३-० अशी भक्कम आघाडी राखली.
दुसऱ्या हाफमध्ये भारतीय संघाने आघाडी कायम ठेवण्यावर भर दिला. या दरम्यान राखीव खेळाडूंनाही मैदानात उतरवण्यात आले. भारताने पाचही राखीव खेळाडूंना खेळण्याची संधी दिली. फारूक आणि केकल यांनी गोल करण्यासाठी काही चांगले प्रयत्न केले, मात्र त्यांना यश मिळाले नाही. दुसरीकडे पाकिस्तानचा संघही गोलच्या शोधात होता. अखेर सामन्याच्या भरपाई वेळेत पाकिस्तानने जोरदार पुनरागमन केले. ९१ व्या मिनिटाला नजीबुल्लाहने हेडरद्वारे गोल करत पाकिस्तानचे खाते उघडले. त्यानंतर ९३ व्या मिनिटाला आलमगीर गाझीने शानदार व्हॉली मारत दुसरा गोल केला. त्यामुळे सामन्याचा स्कोअर ३-२ असा झाला. अखेरच्या क्षणी पाकिस्तानकडून बरोबरी साधण्याचे प्रयत्न झाले. मात्र, भारतीय गोलरक्षक अर्श शेखने निर्णायक बचाव करत प्रतिस्पर्ध्यांचे प्रयत्न हाणून पाडले. परिणामी भारताने ३-२ असा विजय मिळवत सॅफ चॅम्पियनशिप २०२६ मध्ये विजयी सुरुवात केली.