संभाजीनगरमध्ये ७३ वर्षांतील उष्णतेचा विक्रम

राज्यात उन्हाचा चटका अन् पावसाच्या सरी

    दिनांक :05-Nov-2026
Total Views |
मुंबई

chhatrapati sambhajinagar weather राज्यात सध्या हवामानाचे विचित्र स्वरूप अनुभवायला मिळत असून, एकीकडे उन्हाचा कडाका वाढत आहे, तर दुसरीकडे काही भागांत अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. बीड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यांत तुरळक ते मुसळधार पावसाची नोंद होत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र तापमानाने उच्चांक गाठला आहे. शहरातील पारा ३५ अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचल्याने नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.
 

chhatrapati sambhajinagar weather 73-year heat record broken in november, temperature reaches 35°c 
छत्रपती संभाजीनगरमध्ये नोंदवण्यात आलेले तापमान गेल्या ७३ वर्षांतील उच्चांकी ठरले आहे. यापूर्वी २०१८ मध्ये शहराचे कमाल तापमान ३४.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. मात्र, यंदा हा विक्रम मागे पडला आहे. मंगळवारी शहरातील तापमान ३३.६ अंश सेल्सिअस होते. त्यात बुधवारी एकाच दिवसात १.४ अंशांची वाढ होऊन पारा ३५ अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचला. राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालेल्या शहरांच्या यादीत छत्रपती संभाजीनगरने चौथे स्थान पटकावले आहे.
दरम्यान, हवामानातील या अनिश्चित बदलांमुळे राज्यभरात संमिश्र परिस्थिती निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असताना मुंबईत कोरडे हवामान कायम आहे. दुसरीकडे बीड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यांत पावसाच्या सरी बरसत असल्याने नागरिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. ऑक्टोबर महिन्यातील उष्णतेनंतर नोव्हेंबरमध्येही घामाच्या धारा सुरूच असून, रात्रीच्या तापमानात झालेली वाढ लक्षवेधी ठरत आहे. रात्रीच्या वाढत्या तापमानामुळे २९ वर्षांतील विक्रम मोडल्याचीही नोंद समोर आली आहे.
मात्र, येत्या काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या अंदाजानुसार, रविवार किंवा सोमवारपासून तापमानात घट होण्यास सुरुवात होऊ शकते. त्यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. सध्या उन्हाचा तडाखा, काही भागांतील पावसाच्या सरी आणि रात्रीचे वाढते तापमान यामुळे हिवाळ्याचे आगमन लांबणीवर पडणार की राज्यात अवकाळी पावसाचे सत्र कायम राहणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.