वॉशिंग्टन,
democrats-dominate-congress अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने दोन्ही सभागृहांवर नियंत्रण मिळवल्याने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरील राजकीय आव्हाने वाढली आहेत. प्रतिनिधी सभागृह आणि सिनेट या दोन्ही ठिकाणी रिपब्लिकन पक्ष अल्पमतात गेल्यामुळे ट्रम्प यांना आपला कायदेविषयक अजेंडा पुढे नेणे कठीण होऊ शकते. मात्र, काँग्रेसमध्ये बहुमत गमावले असले तरी राष्ट्राध्यक्षांकडे काही महत्त्वाचे घटनात्मक अधिकार कायम आहेत. त्यापैकी ‘प्रेसिडेंशियल व्हेटो’ अर्थात राष्ट्राध्यक्षांचा नकाराधिकार हे महत्त्वाचे अस्त्र ठरू शकते.
डेमोक्रॅट्सनी दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत मिळवल्याने त्यांना विधेयके मांडणे आणि कायदेविषयक कामकाजाला दिशा देणे शक्य होईल. मात्र, काँग्रेसने मंजूर केलेले प्रत्येक विधेयक कायद्यात रूपांतरित होईलच, असे नाही. ट्रम्प यांनी डेमोक्रॅट्सच्या अजेंड्याला विरोध करण्यासाठी नकाराधिकाराचा वापर करण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
राष्ट्राध्यक्षांचा नकाराधिकार नेमका काय आहे?
अमेरिकेच्या संविधानात कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ यांच्यात अधिकारांचे संतुलन राखण्यासाठी नकाराधिकाराची तरतूद करण्यात आली आहे. संविधानाच्या कलम १ मधील विभाग ७ नुसार, काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले विधेयक कायदा होण्यापूर्वी राष्ट्राध्यक्षांकडे पाठवले जाते. त्यानंतर राष्ट्राध्यक्षांना रविवार वगळून दहा दिवसांचा अवधी मिळतो. या काळात ते विधेयकावर स्वाक्षरी करून त्याला कायद्याचे स्वरूप देऊ शकतात किंवा आक्षेप नोंदवत ते काँग्रेसकडे परत पाठवू शकतात.
राष्ट्राध्यक्षांनी विधेयकाला नकार दिल्यास ते संबंधित सभागृहाकडे आक्षेपांसह परत पाठवले जाते. मात्र, यामुळे विधेयकाची प्रक्रिया पूर्णपणे थांबत नाही. काँग्रेसला राष्ट्राध्यक्षांचा नकाराधिकार निष्प्रभ करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी प्रतिनिधी सभागृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांमध्ये दोन-तृतीयांश बहुमताने विधेयक पुन्हा मंजूर करावे लागते. मध्यावधी निवडणुकांनंतर डेमोक्रॅट्सच्या हाती दोन्ही सभागृहांचे नियंत्रण आल्याने त्यांना विधेयके पुढे नेण्याची संधी मिळाली आहे. परंतु, केवळ साधे बहुमत मिळाल्याने राष्ट्राध्यक्षांचा नकाराधिकार रद्द करता येत नाही.
ट्रम्प यांचा व्हेटो रद्द करण्यासाठी किती मते लागतील?
राष्ट्राध्यक्षांचा नकाराधिकार रद्द करण्यासाठी प्रतिनिधी सभागृहातील ४३५ सदस्यांपैकी किमान २९० सदस्यांचे आणि १०० सदस्यांच्या सिनेटमध्ये किमान ६७ सदस्यांचे समर्थन आवश्यक आहे. त्यामुळे डेमोक्रॅट्सकडे दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत असले, तरी नकाराधिकार रद्द करण्यासाठी रिपब्लिकन सदस्यांच्या पाठिंब्याचीही गरज भासू शकते.
याचा अर्थ, डेमोक्रॅट्सनी एखादे विधेयक बहुमताने मंजूर केले तरी ट्रम्प त्यावर नकाराधिकार वापरून त्याला रोखू शकतात. अमेरिकी काँग्रेसच्या अधिकृत नोंदीनुसार, १७८९ पासून राष्ट्राध्यक्षांनी वापरलेल्या २,५९९ नकाराधिकारांपैकी केवळ ११२ वेळा काँग्रेसला तो रद्द करण्यात यश आले आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्षांसाठी हा अधिकार महत्त्वाचा मानला जातो.
‘पॉकेट व्हेटो’चा पर्यायही उपलब्ध
नियमित नकाराधिकारासोबतच राष्ट्राध्यक्षांकडे ‘पॉकेट व्हेटो’ हा आणखी एक पर्याय असतो. या तरतुदीमुळे राष्ट्राध्यक्षांना विधेयक औपचारिकरीत्या काँग्रेसकडे परत न पाठवताही ते कायदा होण्यापासून रोखता येते. नियमानुसार, राष्ट्राध्यक्षांनी दहा दिवसांच्या मुदतीत विधेयकावर स्वाक्षरी केली नाही आणि त्याच काळात काँग्रेसचे अधिवेशन स्थगित झाले किंवा विधेयक परत पाठवणे शक्य राहिले नाही, तर ते विधेयक कायदा बनत नाही. नियमित नकाराधिकाराप्रमाणे पॉकेट व्हेटो रद्द करण्यासाठी काँग्रेसला पुन्हा मतदान करता येत नाही.
अशा परिस्थितीत संबंधित विधेयक पुन्हा सादर करावे लागते. त्यानंतर ते प्रतिनिधी सभागृह आणि सिनेट या दोन्ही ठिकाणी मंजूर करून राष्ट्राध्यक्षांकडे पाठवावे लागते. विशेषतः काँग्रेसचे अधिवेशन संपण्याच्या टप्प्यावर असताना या तरतुदीचा उपयोग होऊ शकतो. मात्र, पॉकेट व्हेटो वापरण्यावरही संविधानाने काही मर्यादा घातल्या आहेत.