नागपूर,
fake-farmer-loan-scamसरकारी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी १० हजार रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवत गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांच्या नावावर तब्बल ७३ कोटी ८२ लाख ९२ हजार ८५० रुपयांचे बनावट कृषी कर्ज उचलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीच्या तिघांना बेंगळुरू आणि मध्य प्रदेशातून अटक केली आहे. यापूर्वी स्थानिक तीन आरोपींनाही अटक करण्यात आली होती.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये मदन गोपाल मल्लिकार्जुन पाटील याला बेंगळुरू येथून, तर या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रियरंजन अशोक कुमार चौधरी ऊर्फ गौरव मिश्रा ऊर्फ गौरव जयस्वाल आणि राहुल ऊर्फ संदीप सतीश दुबे यांना मध्य प्रदेशातील जबलपूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपी गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या नुकसानभरपाईपोटी शासनाकडून दरवर्षी १० हजार रुपये मिळणार असल्याचे सांगत होते. यासाठी भारतीय स्टेट बँकेत खाते उघडणे आवश्यक असल्याचे भासवून त्यांचा विश्वास संपादन केला जात होता. त्यानंतर शेतकऱ्यांकडून आधारकार्ड, पॅनकार्ड आणि सातबारा उतारे घेऊन त्यांना बँकेत नेले जात होते. बँकेतील इंग्रजी भाषेतील कागदपत्रांवर सह्या घेऊन त्यांच्या नावावर लाखो रुपयांचे कृषी कर्ज उचलले जात होते.
दोन शाखांमधून ७३.८२ कोटींचे कर्ज
या टोळीने भारतीय स्टेट बँकेच्या मौदा शाखेतून ५४ कोटी ६९ लाख ४२ हजार ८५० रुपये, तर रामटेक शाखेतून १९ कोटी १३ लाख ५० हजार रुपये असे एकूण ७३ कोटी ८२ लाख ९२ हजार ८५० रुपयांचे कर्ज उचलले. त्यानंतर बनावट कंपन्या स्थापन करून कर्जाची रक्कम संबंधित कंपन्यांच्या खात्यांमध्ये वळविण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
बनावट वेअरहाऊस परवान्यांचाही वापर
फसवणुकीसाठी आरोपींनी केंद्रीय वेअरहाऊसिंग डेव्हलपमेंट अँड रेग्युलेटरी अथॉरिटी (WDRA) चे बनावट वेअरहाऊस परवाने तयार केले होते. या परवान्यांच्या आधारे बनावट इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस रिसीट्स (eNWR) तारण ठेवून 'प्रोड्यूस मार्केटिंग लोन' योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलण्यात आले.
या प्रकरणी मौदा आणि रामटेक पोलीस ठाण्यांत आतापर्यंत १८ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी सचिन कारेमोरे याच्यासह स्थानिक तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. आता आंतरराज्यीय टोळीतील आणखी तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, या मोठ्या आर्थिक फसवणुकीचे आणखी धागेदोरे उघड होण्याची शक्यता आहे.