
‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ या अभियानांतर्गत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या पदयात्रेचा समारोप आज यशवंत स्टेडियम परिसरात झाला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना फडणवीस यांनी काँग्रेसच्या राजकीय भूमिकेवर जोरदार हल्ला चढविला. ही लढाई भाजपा किंवा एनडीएची नसून देशाचे संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. हेमांग जोशी, राज्याचे महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री डॉ. पंकज भोयर, आशिष जयस्वाल यांच्यासह जयदीप कवाडे, आकाश फुंडकर, अशोक उईके, संजय कुटे, राजन वाघमारे, दयाशंकर तिवारी, आ. संजय भेंडे, प्रवीण दटके, कृष्णा खोपडे उपस्थित होते. संविधान चौकात पदयात्रेने या अभियानाचा समारोप झाला. विदर्भातील हजारोंच्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
‘आणिबाणी लादून काँग्रेसने केली संविधानाची हत्या’
राहुल गांधी एका हातात संविधानाची प्रत घेऊन फिरतात. मात्र दुसऱ्या हातातील लाल विचारांचे पुस्तक दाखवीत नाहीत. डॉ. बाबासाहेबांचे संविधान निळे आहे. लाल विचारांपासून संविधानाला धोका आहे, असे सांगत फडणवीस यांनी काँग्रेसवर वैचारिक हल्ला चढविला. संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून आता संविधान बदलण्याची गरज असल्याचे वातावरण निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला. देशात अतिडावी व्यवस्था आणण्याचा त्यांचा डाव असल्याचे सांगत नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तानमधील परिस्थितीचा त्यांनी संदर्भ दिला.
‘एकाही बांगलादेशीला मतदान करू देणार नाही’
काँग्रेस पक्ष भारतीयांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करीत असून, निवडणूक आयोगाला सातत्याने बदनाम करीत आहे. भाजपा संविधानाची पायमल्ली करीत असल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसनेच १९७५ मध्ये आणिबाणी लादून नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेतले होते. या काळात नागरिकांचा अमानुष छळ करण्यात आला. आज तीच काँग्रेस संविधानाच्या संरक्षणाची भाषा करीत आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. पंतप्रधानांविषयी अर्वाच्य भाषा वापरली जात आहे. पराभवामुळे काँग्रेस घाबरली असून, संसद हे जनतेचे प्रश्न आणि विचार मांडण्याचे व्यासपीठ आहे. मात्र, काँग्रेस संसदेच्या कामकाजात अडथळे निर्माण करीत आहे. पण लोकशाहीच्या रक्षणासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी कटिबद्ध असल्याचेही गडकरी यांनी स्पष्ट केले.