बुमराहच्या पंक्तीत कंबोजची एंट्री!

    दिनांक :05-Nov-2026
Total Views |
ऑकलंड,
kamboj-joins-the-ranks-of-bumrah भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला ४ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. ऑकलंडमधील ईडन पार्कवर झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली डकवर्थ-लुईस नियमानुसार पाच गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. अर्शदीप सिंगने सर्वाधिक चार, तर गुरनूर ब्रारने तीन बळी घेतले. मात्र, अवघे दोन बळी मिळवणाऱ्या अंशुल कंबोजनेही सामनावीर पुरस्कार पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

kamboj-joins-the-ranks-of-bumrah
कंबोजसाठी हा पुरस्कार विशेष ठरला. कारण कारकिर्दीतील दुसऱ्याच एकदिवसीय सामन्यात त्याने ही कामगिरी केली. यासह तो भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अनुभवी फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या विशेष यादीत सामील झाला. कंबोजचे एकदिवसीय क्रिकेटमधील पदार्पण फारसे समाधानकारक ठरले नव्हते. ऑक्टोबरच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला एकही बळी मिळवता आला नव्हता. त्याने नऊ षटकांत तब्बल ८२ धावा दिल्या होत्या. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्याच सामन्यात त्याने जोरदार पुनरागमन केले. १० षटके गोलंदाजी करताना अवघ्या २२ धावा देत दोन महत्त्वाचे बळी मिळवले. या अचूक गोलंदाजीच्या जोरावर त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
विशेष म्हणजे, एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजी न करता दोन किंवा त्यापेक्षा कमी बळी मिळवून सामनावीर पुरस्कार जिंकणारा कंबोज हा भारताचा सहावा खेळाडू ठरल्याचा उल्लेख आहे. या यादीत जसप्रीत बुमराह आणि अनिल कुंबळे यांनी प्रत्येकी दोन वेळा अशी कामगिरी केली आहे. याशिवाय मोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, जवागल श्रीनाथ यांचाही या यादीत समावेश आहे. बुमराहने पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, तर कुंबळेने केनिया आणि इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
सामन्यानंतर आपल्या गोलंदाजीच्या रणनीतीबाबत बोलताना कंबोजने सातत्यपूर्ण टप्पा आणि अचूक दिशा यावर भर दिल्याचे सांगितले. खेळपट्टीच्या परिस्थितीचा अतिविचार करण्याऐवजी स्वतःच्या नियोजनानुसार गोलंदाजी करण्यावर त्याने लक्ष केंद्रित केले. या खेळपट्टीवर 'वॉबल सीम' चेंडू प्रभावी ठरू शकतो, हे लक्षात घेऊन त्याने त्याचा वारंवार वापर केला.
मालिकेपूर्वीच्या तयारीबाबतही त्याने आपली भूमिका स्पष्ट केली. गोलंदाजीचा योग्य टप्पा आणि दिशा यांचा सराव करण्यासोबतच प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या जमेच्या आणि कमकुवत बाजू समजून घेतल्याचे त्याने सांगितले. खेळपट्टीचा अंदाज घेऊन कोणत्या टप्प्यावर आणि कोणत्या प्रकारचा चेंडू टाकायचा, यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असल्याचेही कंबोजने स्पष्ट केले.