अनिल कांबळे
नागपूर,
cyber fraud सोशल मीडियावरील ओळखीचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी एका युवकाला ऑनलाइन ई-कॉमर्स गुंतवणुकीच्या जाळ्यात ओढून ८ लाख ४२ हजार ६०० रुपयांनी गंडा घातला. स्नॅपचॅटवर 'रिया अग्रवाल' या बनावट नावाने संपर्क साधून मोठ्या नफ्याचे आमिष दाखविण्यात आले. सुरुवातीला गुंतवलेल्या रकमेवर काही परतावा देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर मोठी रक्कम गुंतवून घेतली. मात्र, नफा तर मिळालाच नाही, उलट आणखी १ लाख २० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. देवेश किशोर बागडे (२९, रा. गरोबा मैदानाजवळ, वर्धमाननगर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने ३ नोव्हेंबर रोजी लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'रिया अग्रवाल' नावाने स्नॅपचॅटवर खाते चालविणाऱ्या व्यक्तीने 'रिया ११' या आयडीवरून बागडे यांच्याशी संपर्क साधला. ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर पैसे गुंतविल्यास भरघोस नफा मिळेल, असे सांगून त्यांना एका लिंकद्वारे गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. सुरुवातीला बागडे यांनी कमी रक्कम गुंतवली. त्यावर आरोपीने काही परतावा दिला. त्यामुळे योजनेची विश्वासार्हता पटल्याने त्यांनी वेगवेगळ्या टप्प्यांत अधिक रक्कम गुंतवली. अशा प्रकारे त्यांनी एकूण ८ लाख ४२ हजार ६०० रुपये हस्तांतरित केले. मात्र, त्यानंतर आरोपीने ना आश्वासन दिल्याप्रमाणे नफा दिला, ना मूळ गुंतवणुकीची रक्कम परत केली. उलट आणखी १ लाख २० हजार रुपये जमा करण्याची मागणी केली. या अतिरिक्त मागणीमुळे संशय आल्याने बागडे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. 'रिया अग्रवाल' या नावाने स्नॅपचॅट खाते चालविणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.