एपीके डाऊनलोड करताच खात्यातून ९९ हजार गायब!

    दिनांक :05-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
nagpur cyber fraud कारचा विमा रद्द करून परतावा मिळविण्याच्या प्रयत्नात एका खासगी कर्मचाऱ्याची ९९ हजार ९०० रुपयांनी ऑनलाइन फसवणूक झाली. विमा पॉलिसी रद्द करण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने सायबर ठगांनी व्हॉट्सॲपवर 'रिफंड माय मनी' नावाची एपीके फाईल पाठविली. ती डाऊनलोड करताच सायबर गुन्हेगारांनी मोबाईलचा ताबा मिळवून बँक खात्यातील रक्कम परस्पर वळती केली. कांती हरिश्चंद्र राठोड (४५, रा. स्वरूपनगर) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्याकडे कार असून या कारची विमा पॉलिसी रद्द करण्यासाठी त्यांनी १३ ऑगस्ट रोजी टाटा एआयजी जनरल इन्शुरन्सच्या कॉल सेंटरशी संपर्क साधला होता. त्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने ९८५४५३८३१० या मोबाईल क्रमांकावरून त्यांच्याशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधला. विमा रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करून परताव्याची रक्कम मिळविण्यासाठी एपीके फाईल डाऊनलोड करण्यास सांगितले. संबंधित व्यक्तीच्या सांगण्यावर विश्वास ठेवून राठोड यांनी ती फाईल डाऊनलोड केली. मात्र, फाईल डाऊनलोड करताच सायबर ठगांना त्यांच्या मोबाईलचा ताबा मिळाला. त्यानंतर १३ ते १५ ऑगस्टदरम्यान त्यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून ऑनलाइन व्यवहाराद्वारे ९९ हजार ९०० रुपये दुसऱ्या बँक खात्यात वळते करण्यात आले. खात्यातील रक्कम गायब झाल्याचे लक्षात येताच राठोड यांनी राणा प्रतापनगर पोलिसांकडे धाव घेतली. ३ नोव्हेंबर रोजी त्यांनी तक्रार दाखल केली.
 

cyber fraud 
विमा पॉलिसी रद्द करणे किंवा रिफंड मिळविण्यासाठी अनोळखी व्यक्तीने पाठविलेली एपीके फाईल डाऊनलोड करू नका. अधिकृत विमा कंपनीच्या संकेतस्थळावरून किंवा अधिकृत ग्राहक सेवा क्रमांकावरूनच व्यवहार करा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.