अनिल कांबळे
नागपूर
nagpur fraud पत्नीच्या गुडघ्याच्या आजारावर उपचार करून देण्यासाठी मुंबईतील डॉक्टरची व्यवस्था करण्याचे आमिष दाखवून तिघांनी ७६ वर्षीय वृद्धाची २ लाख ९४ हजार रुपयांनी फसवणूक केली. डॉक्टरांशी ओळख असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर उपचाराच्या नावाखाली रोख रक्कम, यूपीआय आणि धनादेशाद्वारे पैसे घेतले. मात्र, उपचाराची व्यवस्था न करताच आरोपींनी रक्कम हडपली.
गुलशन मायादास कोहली (७६, रा. ओंकार टॉवर, धंतोली) असे तक्रारदाराचे नाव आहे. त्यांच्या ७१ वर्षीय पत्नी आशा गुलशन कोहली यांच्या गुडघघ्याला त्रास होता. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मुंबईतील डॉक्टर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आरोपींनी दिले होते. याप्रकरणी कोहली यांनी ३ नोव्हेंबर रोजी धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपींपैकी एकाने स्वतःची ओळख गोयल अशी करून दिली. त्याने मुंबईतील डॉ. शिंदे हे आपले परिचित असून ते कोहली यांच्या पत्नीवर आवश्यक उपचार करू शकतील, असे सांगितले. दुसऱ्या आरोपीने डॉ. शिंदे असल्याचे भासवून कोहली यांच्याशी संपर्क साधला. त्यासाठी ९९७५६६७४६२ हा मोबाईल क्रमांक वापरण्यात आला. अन्य एका अनोळखी व्यक्तीचाही या फसवणुकीत सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद आहे. पत्नीच्या उपचाराची व्यवस्था होईल, या अपेक्षेने कोहली यांनी १५ ते १९ ऑक्टोबरदरम्यान आरोपींना रोख रक्कम, यूपीआय व्यवहार आणि धनादेशाद्वारे एकूण २ लाख ९४ हजार रुपये दिले. मात्र, पैसे घेऊनही आरोपींनी डॉक्टरांची व्यवस्था केली नाही. उपचारही झाले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कोहली यांनी पोलिसांकडे धाव घेतली. धंतोली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गोयल आणि डॉ. शिंदे अशी ओळख सांगणाऱ्या व्यक्तींची खरी नावे, तसेच त्यांच्या वैद्यकीय पात्रतेची माहिती तपासली जात आहे.