नागपूर,
nagpur-nehrunagar-budgetनेहरूनगर झोनच्या अर्थसंकल्पावरून विरोधी पक्षनेत्यांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना झोन सभापती सौ. सीमा राजेश ढोमणे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. अर्थसंकल्पावर टीका करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यापेक्षा विरोधी पक्षनेत्यांनी शहराच्या विकासाकडे आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे अधिक लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला त्यांनी दिला.
३ नोव्हेंबर २०२६ रोजी नेहरूनगर झोनअंतर्गत येणाऱ्या चार प्रभागांतील सर्व १६ नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत अर्थसंकल्पीय बैठक पार पडली. या बैठकीत सुमारे १९ कोटी रुपयांचा नेहरूनगर झोनचा अर्थसंकल्प बहुमताने मंजूर करण्यात आला. झोन सभापती म्हणून सर्व सदस्यांना आवश्यक निधी उपलब्ध करून देणे आणि झोनमधील महत्त्वाच्या व तातडीच्या विकासकामांना प्राधान्य देणे ही आपली जबाबदारी असल्याचे नेमणे यांनी स्पष्ट केले.
यंदाच्या अर्थसंकल्पात कोणताही भेदभाव न करता प्रत्येक नगरसेवकाला झोनच्या निधीतून ६१ लाख रुपये देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागासाठी २ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. याशिवाय सुमारे १० कोटी रुपयांचा निधी झोनकडे राखीव ठेवण्यात आला आहे. हा निधी महत्त्वाच्या, मोठ्या आणि तातडीच्या विकासकामांसाठी वापरण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्व नागपुरातील अनेक भागांमध्ये अद्याप उघडे नाले असून नाग नदी व नाल्यांच्या काठावर संरक्षक भिंतींची आवश्यकता आहे. नदी-नाल्यांची नियमित स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजविणे, नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, महिलांसाठी ठिकठिकाणी शौचालये उभारणे, अत्याधुनिक प्रसाधनगृहे, मोठ्या ड्रेनेज लाईन्स आणि भूमिगत नाल्यांची कामे करणे आवश्यक आहे.
तसेच अनधिकृत व अविकसित ले-आऊटमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि डम्पिंग यार्डमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषण व इतर समस्यांवर उपाययोजना करण्यासाठीही निधीची गरज आहे. त्यामुळे भविष्यातील मोठ्या विकासकामांचा विचार करून १० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
विरोधकांकडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
झोनचा निधी हा सभापतीचा वैयक्तिक नसून तो जनतेच्या विकासकामांसाठीच असल्याचे विरोधी पक्षनेत्यांना माहीत आहे. त्यांच्या प्रभागातील कामांचाही या निधीत समावेश होऊ शकतो. मात्र, केवळ विरोधासाठी विरोध करण्याऐवजी नागरिकांच्या समस्या तातडीने कशा सोडविता येतील, याकडे त्यांनी लक्ष द्यावे. विकासकामांवर राजकारण करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे निंदनीय आहे, अशी टीकाही सभापती सीमा नेमणे यांनी केली.
विरोधी पक्षनेत्यांनी विकासकामांना विरोध करण्याऐवजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहनही नेहरूनगर झोन सभापती तथा प्रभाग क्रमांक २८ च्या नगरसेविका सौ. सीमा राजेश ढोमणे यांनी केले.