नवी दिल्ली,
agnipath-scheme अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात भरती झालेल्या अग्निवीरांसाठी केंद्र सरकार महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. चार वर्षांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना आणखी दोन वर्षे सैन्यात काम करण्याची संधी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. विशेष म्हणजे, या वाढीव सेवा कालावधीत त्यांना विवाह करण्याची परवानगी देण्याचाही विचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
अग्निपथ योजनेच्या सुरुवातीपासूनच चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर तिचा आढावा घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार करण्यात आलेल्या मूल्यांकनात अग्निवीरांची कामगिरी समाधानकारक असल्याचे आढळून आले. लष्करातील विविध जबाबदाऱ्या आणि मोहिमांमध्येही त्यांनी चांगली कामगिरी केल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. त्यामुळे त्यांच्या सेवेला आणखी दोन वर्षांची मुदत देण्याचा पर्याय पुढे आला आहे. संरक्षण सचिवांनी या योजनेला लष्कर आणि अग्निवीर या दोघांसाठीही फायदेशीर ठरणारा पर्याय असल्याचे म्हटले आहे.
प्रस्तावित बदलानुसार, चार वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीरांना अतिरिक्त दोन वर्षे सैन्यात कार्यरत राहता येऊ शकते. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपी सैन्यात भरती होण्याची इच्छा असलेल्या अग्निवीरांना पुन्हा संधी मिळू शकते. मात्र, त्यासाठी संबंधितांना निर्धारित पात्रता आणि निवड प्रक्रियेतील निकष पूर्ण करावे लागतील. तसेच नियमित सेवेत सहभागी होण्यासाठी त्यांची संमतीही आवश्यक असेल.
या निर्णयामुळे अग्निवीरांना आपली क्षमता आणि कौशल्य सिद्ध करण्यासाठी अधिक वेळ मिळू शकतो. त्याचबरोबर अनुभवी आणि उत्तम कामगिरी करणाऱ्या जवानांना सैन्यात कायम ठेवण्याची संधी संरक्षण दलांना उपलब्ध होईल. वाढीव दोन वर्षांच्या सेवेदरम्यान विवाह करण्याची परवानगी देण्याबाबतही विचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, बुधवारी संरक्षण दलांचे प्रमुख (सीडीएस) जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांनी अग्निपथ योजनेतील संभाव्य बदलाबाबत घोषणा केली होती. चार वर्षांचा कार्यकाळ संपत आलेल्या अग्निवीरांना आणखी दोन वर्षे सेवा करण्याची संधी देण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर आवश्यक पात्रता पूर्ण करणाऱ्या आणि कायमस्वरूपी सेवेत जाण्यास इच्छुक असलेल्या अग्निवीरांना नियमित सैन्यात भरती होण्याची संधी दिली जाईल. त्यामुळे या प्रस्तावित बदलांकडे अग्निवीर आणि संरक्षण दलांचे लक्ष लागले आहे.