पिंपरी
pune metro पुणे आणि आयटी नगरीला जोडणाऱ्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर ही बहुचर्चित बहुप्रतिक्षित मेट्रो मार्गिका सेवेत दाखल होताच प्रवाशांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. बुधवारी (४ नोव्हेंबर) प्रवासाच्या पहिल्याच दिवशी तब्बल ५० हजार प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास केला. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे शहरातील बहुतांश कार्यालये आणि व्यावसायिक आस्थापने बंद असतानाही पुणेकरांनी मेट्रो प्रवासाला पहिली पसंती दर्शवली आहे.
जिल्हा न्यायालय स्थानकावर सर्वाधिक गर्दी
या संपूर्ण मार्गावर 'जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक' प्रवाशांच्या सर्वाधिक पसंतीचे केंद्र ठरले. पुणे रेल्वे स्थानकासह शहराच्या इतर भागांना जोडणारे हे प्रमुख केंद्र असल्याने एकट्या या स्थानकावरून दिवसभरात सुमारे २५ हजार प्रवाशांनी ये-जा केली.
गर्दीच्या वेळेत दर ५ मिनिटांनी सुटणार मेट्रो
दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर पुढील दोन आठवड्यांत सर्व कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर प्रवासी संख्येत मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मेट्रो प्रशासनाने वेळापत्रकात बदल करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार गर्दीच्या वेळेत दर ५ मिनिटांनी, तर इतर वेळेत दर ८ मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असेल. हिंजवडी ते शिवाजीनगर हा प्रवास अवघ्या ४० मिनिटांत पूर्ण होणार असल्याने आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे.
एसीएमसी कार्ड आणि सायकल सुविधेला परवानगी
एकाच कार्डवर पुणे मेट्रोच्या सर्व मार्गांवर प्रवास शक्य झाल्याने पहिल्याच दिवशी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' सुविधेलाही चांगला प्रतिसाद मिळाला. प्रवाशांनी या सुविधेचे स्वागत केले. याशिवाय, 'लास्ट माइल कनेक्टिव्हिटी' आणि पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी मेट्रोतून सायकली नेण्याची परवानगी देण्यात आली आहे, ज्याचा फायदा सायकलप्रेमी प्रवाशांना होत आहे.
"पहिल्याच दिवशी पुणेकरांनी दिलेला प्रतिसाद अत्यंत आनंददायी आहे. प्रवासातील आराम, कनेक्टिव्हिटी आणि वेळेची बचत यांमुळे नागरिकांनी या सेवेचे स्वागत केले आहे.
"
— अनिल कुमार सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड