पुणे
harad pawar राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे शेतकऱ्यांच्या भेटीचा दौरा अर्धवट सोडावा लागला आहे. आता हा दौरा पूर्ण करण्याची जबाबदारी आमदार रोहित पवार यांनी स्वीकारली आहे. यंदा घरची दिवाळी बाजूला ठेवून शेतकरी आणि शेतमजुरांच्या कुटुंबीयांसोबत सण साजरा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देणे आणि त्यांच्या व्यथा जाणून घेणे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचेही त्यांनी सांगितले.
शरद पवार यांना खोकल्याचा त्रास तसेच छातीत दुखत असल्याने पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांच्या उपचारांनंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मात्र, त्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना पुन्हा रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती चांगली असून, खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.
शरद पवार यांची दर चार ते पाच महिन्यांनी नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यानुसार यापुढे मुंबईतही त्यांच्या नियमित डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शरद पवार यांचा शेतकरी भेटीचा दौरा प्रकृतीच्या कारणास्तव पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे दौऱ्यातील उर्वरित भाग पूर्ण करण्यासाठी आपण पुढाकार घेतल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. यंदा दिवाळी घरात साजरी करण्याऐवजी शेतकरी आणि शेतमजुरांच्या दारात जाऊन त्यांच्या कुटुंबीयांसोबत सणाचा आनंद वाटून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.विशेषतः आत्महत्येचा विचार केलेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार देणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करणे, यावर या दौऱ्यात भर दिला जाणार आहे. संकटाच्या काळात शेतकरी कुटुंबे एकटी नाहीत, त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आपण आहोत, हा विश्वास या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.