अमित शाह यांच्या हस्ते उत्तराखंडमध्ये ६२ प्रकल्पांचे लोकार्पण

    दिनांक :06-Nov-2026
Total Views |
डेहराडून,
amit-shah उत्तराखंडच्या विकासाला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध पायाभूत प्रकल्पांवर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी डेहराडून येथील परेड ग्राऊंडवर आयोजित राज्योत्सव कार्यक्रमात १,४७५.३१ कोटी रुपयांच्या ६२ विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. यामध्ये ४०२.२० कोटी रुपयांच्या १८ प्रकल्पांचे लोकार्पण, तर १,०७३.११ कोटी रुपयांच्या ४४ प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. रस्ते, वीज, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि शहरी विकासाशी संबंधित या प्रकल्पांमुळे राज्यातील पायाभूत सुविधांना बळ मिळणार आहे.
 
amit-shah
 
यावेळी अमित शाह यांनी २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या संकल्पात उत्तराखंडची महत्त्वपूर्ण भूमिका असेल, असे प्रतिपादन केले. राज्योत्सव हा उत्तराखंडच्या अभिमानाचा, यशाचा आणि भविष्यातील संकल्पांचा सोहळा असल्याचे त्यांनी सांगितले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्य विकासाच्या नव्या दिशेने वाटचाल करत असल्याचे शाह म्हणाले.
 
उत्तराखंडच्या आर्थिक प्रगतीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, २०२२ च्या तुलनेत राज्याच्या सकल राज्यांतर्गत उत्पादनात (जीएसडीपी) ५० टक्के, तर दरडोई उत्पन्नात ४० टक्के वाढ झाली आहे. ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये करण्यात आलेल्या ३.५६ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारांपैकी एक लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक प्रत्यक्षात आली आहे. राज्यातील ३५ हजार तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या असून तीन लाखांपेक्षा अधिक महिला 'लखपती दीदी' बनल्याची माहितीही त्यांनी दिली.
 
राज्य सरकारच्या धोरणांचा उल्लेख करताना अमित शाह यांनी समान नागरी संहिता, नक्कलविरोधी कठोर कायदा आणि धर्मांतरविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा संदर्भ दिला. तसेच दिल्ली-डेहराडून द्रुतगती मार्ग, चारधाम ऑल-वेदर रोड, ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे मार्ग आणि केदारनाथ व हेमकुंड साहिब रोपवे यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे उत्तराखंडमधील दळणवळण आणि पर्यटनाला चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांचेही त्यांनी कौतुक केले.
  
यावेळी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अमित शाह यांचे स्वागत करत केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे राज्याच्या विकासाला गती मिळत असल्याचे सांगितले. कनेक्टिव्हिटी, पर्यटन, उद्योग, स्वयंरोजगार आणि पायाभूत सुविधांचा विस्तार यामुळे उत्तराखंडची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नीती आयोगाच्या शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांकात उत्तराखंडने प्रथम क्रमांक मिळवल्याचाही त्यांनी उल्लेख केला. उत्तराखंड पोलिसांना प्रतिष्ठित 'राष्ट्रपती पोलीस कलर्स' प्रदान केल्याबद्दल त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभार मानले.
 
राज्योत्सवाच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १५ मान्यवरांना 'उत्तराखंड गौरव सन्मान पुरस्कार-२०२६' प्रदान करण्यात आले. प्रसिद्ध लोकगायक नरेंद्र सिंह नेगी आणि अभिनेते हेमंत पांडे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय, असामान्य धैर्य आणि शौर्य दाखवणाऱ्या सहा बालकांना पहिल्यांदाच देण्यात आलेल्या 'मुख्यमंत्री राज्य बाल शौर्य पुरस्कार'ने गौरविण्यात आले. प्रत्येक पुरस्कारप्राप्त बालकाला ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
 
कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री धामी यांनी अमित शाह यांना उत्तराखंडची पारंपरिक टोपी, शाल, गंगाजळी आणि समुद्रमंथनाचे प्रतीक भेट दिले. या सोहळ्याला राज्याचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री अजय तामता, खासदार, मंत्री, आमदार, विविध लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.